कोलकता : देशात करोनाची वाढता कहर लक्षात घेता पश्चिम बंगाल मधल्या ममता बॅनर्जी सरकारनं सोमवारी अनेक मोठे निर्णय जाहीर केलेत. करोना व्हायरसशी दोन हात करण्यासाठी राज्य सरकार २०० कोटी रुपये उभारणार असल्याची घोषणा, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली. सर्व शिक्षण संस्थांना बंद ठेवण्याचा कालावधी वाढवत त्यांनी १५ एप्रिलपर्यंत या संस्था बंद ठेवण्याचे आदेश दिलेत. ३१ मार्चपर्यंत सर्व सिनेमाघरही बंद राहतील, असं ममता बॅनर्जी यांनी जाहीर केलं.
ममता यांनी करोना व्हायरसमुळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर हे निर्देश दिलेत. ‘पश्चिम बंगालमध्ये जवळपास ३.२४ लाख नागरिकांची तपासणी केली गेलीय. यातील ५५९० जणांवर आवश्यक देखरेख ठेवण्यात येतेय. राज्यात आत्तापर्यंत एकही करोना व्हायरसचा रुग्ण आढळलेला नाही’ असं ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केलं.
तरीदेखील, खबरदारीचा उपाय म्हणून सरकारनं सर्व शिक्षण संस्था बंद ठेवण्याच्या कालावधीत वाढ केली आहे. दरम्यान, देशातील करोनाग्रस्तांची संख्या ११४ वर पोहचलीय. १५ राज्यांमध्ये करोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. एकट्या महाराष्ट्रात सर्वाधिक अर्थात ३३ करोनाचे रुग्ण आढळल्याचं उघड झालंय. या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची परवानगी दिली जावी, यामुळे सार्वजनिक परिवहन सेवेचा वापर कमी होईल, अशी सूचना आरोग्य मंत्रालयानं केलीय. तसंच देशातील सगळ्या शाळा, जलतरण तलाव, मॉल इत्यादी ३१ मार्चपर्यंत बंद राहतील, असेही आरोग्य मंत्रालयानं निर्देश दिलेत.

अधिक वाचा  टीम इंडियाच्या घोषणेपूर्वीच कापला गेला या खेळाडूचा पत्ता