पिंपरी: पिंपरी-चिंचवडमधून पलायन करणाऱ्या करोनाग्रस्त रुग्णाला चार तासांनी पुन्हा नाट्यमयरित्या पकडण्यात वैद्यकीय अधिकारी व शहर पोलिसांना यश आले. शनिवारी पहाटे घडलेल्या या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, कोणीही घाबरून जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. सध्या या रुग्णाला पुन्हा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, परदेशातून आलेल्या एका तरूणाला शहरातील महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर शनिवारी रात्री नऊच्या सुमारास त्याची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. डॉक्टर फॉर्म भरून घेत असताना घाबरलेल्या त्या तरूणाने डॉक्टरांची नजर चुकवून हॉस्पिटलमधून पलायन केले. घटनेनंतर डॉक्टर आणि संबंधित अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली. याची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर सहायक पोलिस आयुक्त संबंधित भागाचे वरिष्ठ निरीक्षक, फौजदार यांनी कर्मचाऱ्यांसह हॉस्पिटलमध्ये धाव घेतली.
पळून गेलेल्या तरूणाचा शोध घेण्यास सुरूवात करण्यात आली. पोलिस व डॉक्टर त्याच्या घरी गेले. तेथून त्याला संपर्क करण्यात आला, तेव्हा तो जवळच असलेल्या एका मित्राच्या घरी जाऊन बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस आणि डॉक्टरांचे पथक रुग्णाच्या घरी गेले. त्याला घराजवळ बोलावण्यात आले. घराजवळ येताच रुग्णाला पोलिसांनी घेराव घालून रुग्णवाहिकेत बसविले. हे करताना पोलिसांनीही विशेष खबरदारी घेतली. या तरूण निघून गेल्यावर ज्या-ज्या लोकांना भेटला त्या सर्वांची चाचणी करण्यात आली असून, सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणानंतर महापालिकेच्या सर्वच रुग्णालयात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

अधिक वाचा  स्वबळाच्या नाऱ्यावर शरद पवारांनी उद्धव ठाकरेंची बाजू सावरली, पण आता मात्र…