नगर : जिल्ह्य़ातील १७ संशयितांच्या स्त्रावाचे नमुने पुण्यातील राष्ट्रीय प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवले गेले होते. त्यांपैकी ८ व्यक्तींचे अहवाल जिल्हा रुग्णालयाला आज, सोमवारी दुपारपर्यंत प्राप्त झाले, ते आठही जण करोना बाधित नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र एकास ‘स्वाइन फ्लू’ची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान यापूर्वी आढळलेल्या एकमेव करोनाबाधित रु ग्णाची प्रकृती उत्तम असून त्याला कोणताही त्रास जाणवत नाही.
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी ही माहिती दिली. जिल्ह्य़ातील आरोग्यस्थिती पूर्ण नियंत्रणात असल्याचा दावाही त्यांनी केला. गर्दी रोखण्यासाठी तसेच प्रतिबंधात्मक उपायांसाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद दिल्यास करोनाचा धोका लवकर संपेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या वेळी महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर, निवासी उपजिल्हाधिकारी उदय किसवे, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. संदीप सांगळे, मनपा आरोग्याधिकारी डॉ. अनिल बोरगे आदी या वेळी उपस्थित होते.
यापूर्वी एकूण १५ तर आज सकाळी प्रत्येकी २ असे एकुण १७ संशयितांचे नमुने तपासणीसाठी पाठवले गेले होते. त्यातील ८ जणांचे अहवाल प्राप्त झाले, त्यांना करोनाची बाधा झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. उर्वरित ९ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. ज्या आठ जणांचे अहवाल प्राप्त झाले ते निगेटिव्ह आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरु न जाण्याचे कारण नाही. यात्रा, जत्रा, मोठे उत्सव, विवाह समारंभ याठिकाणी होणारी गर्दी नागरिकांनी टाळण्याचे आवाहन द्विवेदी यांनी पुन्हा केले. संबंधित उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांमार्फत तशा सूचना दिल्या आहेत. आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असेही त्यांनी सांगितले.
महापालिका व जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकीय सभा नजीकच्या काळात होणार आहेत. या सभांना गर्दी असते, याकडे लक्ष वेधले असता जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी या संस्थांनी महासभा टाळाव्यात, घेऊ नयेत, असे आवाहन केले. या संस्था स्वायत्त असल्या तरी अपवादात्मक परिस्थितीत अंदाजपत्रक मंजूर करण्याचे अधिकार आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आहेत. पुढील महासभेत त्यासाठी सदस्यांच्या सूचना विचारात घेता येतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
१० देशांतून परतलेल्यांवर निर्बंध
यापूर्वी चीन, इटली, इराण, स्पेन, जर्मनी, दक्षिण कोरिया व फ्रान्स या सात देशातून भारतात आलेल्या नागरिकांना वैद्यकीय पथकाच्या निरीक्षणाखाली ठेवले जात होते. आता त्यात दुबई, सौदी अरेबिया व अमेरिका या देशांचाही समावेश करण्यात आला आहे. या १० देशातून आलेल्या नागरिकांना रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात ठेवले जाणार आहे, तर याशिवाय इतर देशातून आलेल्या नागरिकांना घरातच स्वतंत्रपणे निरीक्षणाखाली ठेवले जाणार आहे.
शिकवणी वर्ग बंद, आंदोलनाला परवानगी नाही
करोना आजाराच्या फैलावास प्रतिबंध करण्यासाठी कोणत्याही आंदोलनाला परवानगी दिली जाणार नाही, खासगी शिकवणीवर्ग बंद ठेवण्याचे आदेश आहेत. ते बंद ठेवले नाही तर गुन्हे दाखल करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. याशिवाय ग्रामीण भागातील चित्रपटगृहे, नाटय़गृहे, जलतरण तलाव, व्यायामशाळा, संग्रहालये साथरोग प्रतिबंध कायद्यान्वये दि. ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
बोटावर खूण आणि पोलिसांमार्फत लक्ष
ज्या संशयितांना घरीच निरीक्षणाखाली ठेवले गेले आहे त्यांनी घराबाहेर पडू नये, यासाठी आरोग्य कर्मचारी व पोलिसांमार्फत त्यांच्यावर लक्ष ठेवले जाणार आहे. या नागरीकांनी स्वत:ची काळजी घ्यावी, यासाठी हा उपाय करण्यात आला आहे. जर ते घराबाहेर पडताना आढळले तर त्यांना सक्तीने रुग्णालयात पाठवले जाणार आहे. सर्व संशयितांच्या हाताच्या बोटावर, ते ओळखू यावेत यासाठी शाईची खूण केली जाणार आहे. सध्या शेतकरी कर्जमाफी योजना सुरु आहे, त्यासाठी आधार केंद्रावर प्रमाणीकरण केले जाते, त्यासाठी केंद्रावर सॅनिटायझर ठेवण्यात आल्याची तसेच बँकांच्या एटीएममध्ये सॅनिटायझर ठेवण्याची सूचना केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी दिली.