पुणे : राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे पाठवलेल्या २८ नागरिकांच्या वैद्यकीय नमुन्यांपैकी २७ नागरिकांचे वैद्यकीय नमुने तपासले असता त्यांना करोना संसर्ग नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याबरोबर पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांतील १६ करोना बाधित रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सोमवारी दिली.
विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर म्हणाले, सध्या २८ पैकी २७ जणांच्या वैद्यकीय नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. मात्र, प्रतिबंधात्मक उपाय म्हणून चीन, इटली, इराण, फ्रान्स, स्पेन, जर्मनी, दक्षिण कोरियाबरोबरच आता दुबई, सौदी अरेबिया आणि अमेरिकेतून आलेल्या नागरिकांना देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रांमध्ये रविवारी संध्याकाळपर्यंत अनुक्रमे सात आणि नऊ करोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी सर्व प्रवासी परदेशातून भारतात आलेले किंवा त्यांच्या नजिकच्या संपर्कातील आहेत. सोमवारी दोन्ही शहरांमध्ये नवे रुग्ण आढळलेले नाहीत. त्यामुळे इतर नागरिकांनी घाबरून जाऊ नये, मात्र शासकीय आदेशांचे पालन करावे. खबरदारीचा उपाय म्हणून शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे तसेच यात्रा, जत्रा आणि सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. नागरिकांनी या आदेशांचे पालन करावे आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.