चेन्नई: करोना व्हायरसमुळे जगभरातील अनेक स्पर्धा रद्द केल्या आहेत. तर काही स्पर्धा स्थगित केल्या आहेत. क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन, टेनिससह जवळपास सर्वच स्पर्धा रद्द केल्या असून यात आता बुद्धीबळाचा देखील समावेश झाला आहे. भारताचा ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद सध्या जर्मनीमध्ये एससी बॅडेन स्पर्धा खेळत आहे. पाच वेळा विश्वविजेता आनंदला सोमवारी (१६ मार्च) जर्मनीतून घरी परत यायचे होते. पण करोना व्हायरसमुळे त्याला जर्मनीतच थांबावे लागले आहे.
आनंद फेब्रुवारीपासून जर्मनीत आहे. एक आठवड्यापासून आनंदला इतरांपासून वेगळ ठेवण्यात आले आहे. यासंदर्भात टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना आनंद म्हणाला, माझ्यासाठी हा एक विचित्र अनुभव आहे. माझ्या आयुष्यात असे प्रथमच घडत आहे की, मला अन्य लोकांपासून वेगळ ठेवले गेले आहे. करोना व्हायरसमुळे आनंदला या महिन्याच्या अखेरपर्यंत चेन्नईत येता येणार नाही. याबाबत आनंदची पत्नी अरुणा देखील काळजीत आहे. आनंद जर्मनीत आहे. पण तेथे अडकलेल्या अन्य लोकांपेक्षा आनंदची परिस्थिती अधिक चांगली आहे, हा मोठा दिलासा असल्याचे अरुणा यांनी सांगितले. आम्ही सर्व जण आनंदला खुप मिस करतोय. त्याला चांगले जेवण आणि वारंवार हात धुवण्यास सांगतोय. या महिन्याच्या अखेरपर्यंत तो भारतात येईल अशी आशा आहे, असे अरुणा म्हणाल्या.
रोज घरातून फोन येते. मी पत्नी अरुणा आणि मुलगा अखिल यांच्यासोबत व्हिडिओ चॅट करतो असे आनंदने सांगितले. करोना व्हायरसमुळे मी सध्या जगभरातील मित्रांसोबत चॅट करतो. इंटरनेटमुळे आम्ही बोलू शकतो. याशिवाय दिवसभरात मी दोनवेळा फिरण्यास जातो. कोणी भेटले तर काही अंतर लांब राहून बोलतो असे आनंद म्हणाला. त्याच बरोबर मुलगा अखिल याला फ्रेंच परीक्षेसाठी मदत करत असल्याचे त्याने सांगितले.

अधिक वाचा  प्रतीक्षा संपली! लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून मिळणार? योजनेबाबत सर्वात मोठी अपडेट