रिलायन्स समुहाचे प्रमुख अनिल अंबानी यांच्यानंतर येस बँक प्रकरणी एस्सेल समुहाचे प्रमुख सुभाष चंद्रा, जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल, इंडिया बुल्सचे अध्यक्ष समीर गहलोत यांच्यासह १८ जणांना सक्तवसुली संचलनालयानं (ईडी) समन्स बजावलं आहे. सोमवारी ईडीच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली.
दरम्यान, डीएचएफएलचे व्यवस्थापकीय संचालक कपिल वाधवान यांच्यासह रिलायन्स समुहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांना १९ मार्च रोजी ईडीच्या मुंबईतील कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वाधवान यांना ईडीनं एका अन्य प्रकरणात अटक केली होती. येस बँकेनं अनिल अंबानी यांच्या समुहाला, तसंच आयएलएफएस, डीएचएफएल आणि व्होडाफोन सारख्या कंपन्यांना कर्ज दिलं असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली होती.
१९ मार्चला हजर राहण्याचे आदेश
येस बँकेकडून कर्ज घेऊन ते थकविलेल्या बड्या व्यावसायिकांना आता सक्तवसुली संचालनालयाकडून जबाब नोंदविण्यासाठी बोलाविले जाणार आहे. या प्रकरणी रिलायन्स समूहाचे (एडीएजी) अध्यक्ष अनिल अंबानी यांच्यावर महासंचालनालयाने समन्स बजावून सोमवारी हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, प्रत्यक्ष हजर राहण्यासाठी त्यांनी सवलत मागितल्यामुळे आता १९ मार्चला हजर राहण्याचे समन्स त्यांच्यावर बजावण्यात आले आहे. अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समूहाशी संबंधित कंपन्यांनी १२ हजार ८०० कोटींचे कर्ज येस बँकेकडून घेतले आहे. या कर्जाची परतफेड करण्यात आलेली नाही. “या कर्जाची परतफेड करण्याची रिलायन्स समूहाची मनोमन इच्छा आहे. सध्या त्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. राणा कपूर वा त्यांच्या कुटुंबीयांशी रिलायन्स समूहाचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही,” असे प्रसिद्धी पत्रक रिलायन्स समूहाच्या वतीने गेल्या आठवड्यात जारी करण्यात आले आहे.

अधिक वाचा  अपघातवार ! राज्यात 2 विचित्र अपघातात 12 जण ठार, कुठे घडली दुर्घटना ?