मुंबई : तुमच्या बँकेने तुम्हाला देऊ केलेले डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरून तुम्ही आतापर्यंत एकदाही ऑनलाइन व्यवहार केले नसतील, तर आज, सोमवारपासून तुमचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड ऑनलाइन व्यवहारांसाठी निष्क्रिय होणार आहे.
या कार्डांवर बँकेने देऊ केलेली ऑनलाइन, कॉन्टॅक्टलेस व्यवहारांची सुविधा बँका काढून घेतील. मात्र या सुविधा नव्याने अर्ज करून सुरू करता येतील. डेबिट व क्रेडिट कार्ड यांचे क्लोनिंग करून किंवा त्यांचा पिन शोधून काढून त्याद्वारे कार्डधारकाच्या खात्यातून मोठ्या रकमांचा अपहार करण्याचे प्रमाण सध्या वाढले आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी तसेच या कार्डांची सुरक्षितता वाढवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने १५ जानेवारी २०२० रोजी एक परिपत्रक प्रसिद्ध केले होते. त्यामध्ये ही कार्डे ऑनलाइन व्यवहारांसाठी एकदाही वापरली गेली नसतील तर त्यांची ही सुविधा १६ मार्चपासून थांबवण्यात यावी, असे बँकांना सांगण्यात आले होते.
त्यानुसार आज अशा कार्डांसाठी या सुविधेचा शेवटचा दिवस असणार आहे. कॉन्टॅक्टलेस व्यवहार डेबिट किंवा क्रेडिट कार्ड बाळगणाऱ्या कार्डधारक ग्राहकाने या कार्डांचा वापर करून रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेन्टिफिकेशन (आरफिड) तंत्रज्ञानाने, वस्तूची खरेदी ऑनलाइन केली तर अशा व्यवहाराला कॉन्टॅक्टलेस व्यवहार म्हणतात. कार्ड देणारा निर्णय घेणार रिझर्व्ह बँकेने आपल्या परिपत्रकात हे स्पष्ट केले आहे की, डेबिट व क्रेडिट कार्ड वापरून ऑनलाइन व्यवहार, कॉन्टॅक्टलेस व्यवहार किंवा आंतरराष्ट्रीय व्यवहार एकदाही केले नसतील तर अशा कार्डधारकाचे कार्ड १६ मार्चपासून निष्क्रिय करावे असे परिपत्रकात नमूद करण्यात आले असले तरी, प्रत्यक्षात ते कधी निष्क्रिय करायचे याचा निर्णय कार्ड देणाऱ्या संस्थेने, अर्थात बँकेने घ्यायचा आहे. त्यानुसार काही बँकांनी आपल्या कार्डधारकांना संदेश पाठवले आहेत. त्यात काही बँकांनी ही कार्डे ३१ मार्चपर्यंत निष्क्रिय करण्यात येतील, असे म्हटले आहे.
हे कशासाठी?
गेल्या काही वर्षांपासून डेबिट व क्रेडिट कार्डांचा वापर अनेक पटींनी वाढला आहे. त्याचप्रमाणे या कार्डांचा वापर करून आंतरराष्ट्रीय व्यवहार, कॉन्टॅक्टलेस व्यवहार आणि ऑनलाइन व्यवहारही वाढले आहेत. हे व्यवहार अधिक परिणामकारक व्हावेत, वापरकर्त्यांसाठी ते अधिक सुटसुटीत व्हावेत यासाठी या कार्डांची सुरक्षितता वाढवणे गरजेचे आहे. म्हणूनच रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार सर्व बँकांनी चिप आधारित कार्डे काही महिन्यांपूर्वी आपल्या ग्राहकांना दिली. या सुरक्षिततेचाच एक भाग म्हणून आजपासून कोणतेही ऑनलाइन, कॉन्टॅक्टलेस व्यवहार न झालेली कार्डे निष्क्रिय केली जाणार आहेत.