नवी दिल्ली : सध्या गोव्याचे राज्यपालपदाची संविधानिक जबाबदारी खांद्यावर असणाऱ्या सत्यपाल मलिक यांचं एक वक्तव्य सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलंय. मलिक यांच्या म्हणण्यानुसार, ‘राज्यपालांकडे कोणतंही काम नसतं’. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर ‘काश्मीरचा राज्यपाल तर फक्त दारू पितो आणि गोल्फ खेळतो’ असं वादग्रस्त वक्तव्यही त्यांनी यावेळी केलं. उल्लेखनीय म्हणजे, जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढत संसदेनं अनुच्छेद ३७० रद्द केला तेव्हा जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक हेच होते.
सत्यपाल मलिक हे उत्तर प्रदेशमध्ये बागपत दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलंय. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. बागपतमध्ये एका जनसभेला संबोधित करताना सत्यपाल मलिक यांनी ही टिप्पणी केलीय.
‘राज्यपालांकडे काहीही काम नसतं. काश्मीरचा राज्यपाल बऱ्याचदा दारू पितो आणि गोल्फ खेळतो. बाकी इतर ठिकाणी जे राज्यपाल असतात ते आरामात राहतात. कोणत्याही भांडणात ते पडत नाहीत’ असं एकेकाळी बिहार आणि जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदाची सांभाळणारे सत्यपाल मलिक म्हणताना या व्हिडिओत दिसत आहेत.
नरेंद्र मोदी सरकारनं ५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारा अनुच्छेद ३७० हटवण्याचा निर्णय घेतला तेव्हा सत्यपाल मलिक यांच्याकडे अनेकांचं लक्ष होतं. कारण या दरम्यान, राज्याची प्रशासनिक कामं आणि सुरक्षेची जबाबदारी मलिक यांच्या खांद्यावरच होती. त्यांच्याच कार्यकाळात जम्मू-काश्मीरला जम्मू-काश्मीर आणि लडाख अशा दोन भागांत विभाजित करण्यात आलं.
त्यानंतर ३ नोव्हेंबर २०१९ रोजी सत्यपाल मलिक यांची गोव्याच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली होती. गोव्याचे राज्यपाल म्हणून शपथ घेताना त्यांनी, ‘जम्मू-काश्मीरकडे समस्याग्रस्त भाग म्हणून पाहिलं जातं परंतु, आलेल्या अडचणींचा सामना यशस्वीरित्या केला आणि राज्याच्या सर्व अडचणी दूर केल्या’ असा दावा मलिक यांनी केला होता.
याच भाषणादरम्यान त्यांनी आपल्या कार्यकाळातील काही आठवणीही सांगितल्या. ‘मी बिहारचा राज्यपाल असताना राज्यात १०० महाविद्यालय राजकारण्यांचे होते. त्यांच्याकडे एक शिक्षकदेखील नव्हता, इथे प्रत्येक वर्षी बीएड मध्ये प्रवेश घेतला जात होता आणि पैसे देऊन पास होत होते, डिग्र्या वाटल्या जात होत्या. मी हे सगळे महाविद्यालय बंद केले आणि एक केंद्रीयकृत परीक्षा प्रणाली विकसीत केली’ असंही त्यांनी बागपतमध्ये सांगितलं.

अधिक वाचा  लाडक्या बहिणींना पुन्हा लॉटरी, नोव्हेंबरचे पैसे अॅडव्हान्समध्ये मिळणार, 10 ऑक्टोबरपर्यंत खात्यात 3 हजार जमा होणार!