मुंबई: करोनामुळे मास्कची मोठ्या प्रमाणावर मागणी होत आहे. या परिस्थितीचा फायदा घेणाऱ्या एका ऑनलाइन भामट्याने एका उद्योजिकेची चार लाखांची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे. वडाळा टीटी पोलिसांनी याप्रकरणी आरोपीस अटक केली आहे.
वडाळा पूर्वेतील एका महिला उद्योजिकेचा गणवेश तयार करून परदेशात निर्यात करण्याचा व्यवसाय आहे. सध्या मास्कची मागणी वाढली असताना परदेशातील विविध कंपन्यांकडून त्यांच्याकडे मास्क पुरवठ्याबाबत विचारणा सुरू झाली. तेव्हा मास्कचा पुरवठा कुठून होऊ शकते, हे शोधत असताना त्यांना इंटरनेटवर ओडिशातील भक्ती एंटरप्रायजेस या कंपनीची जाहिरात दिसली. वेबसाइटवरील माहितीनुसार त्यांनी या कंपनीशी संपर्क साधून १४ लाख ४० हजार रुपये किंमतीच्या १ लाख ६० हजार मास्कची खरेदीची ऑर्डर दिली. त्यासाठी कंपनीच्या बोदले मुस्ताक याला ५ मार्च रोजी चार लाख रुपयांची आगावू रक्कमही दिली. मात्र त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी वडाळा टी.टी. पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
पोलिसांनी तपास केला असता भक्ती एंटरप्रायजेस ही बनावट कंपनी असल्याचे स्पष्ट झाले. जाहिरातीसाठी मुस्ताकने वेबसाइटवर जोडलेले जीएसटी, आयएसओ सर्टिफिकेटही बोगस असल्याचे स्पष्ट झाले. तपासाअंती मुस्ताक यास अटक केल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विद्यासागर कालकुंद्रे यांनी सांगितले. मुस्ताक याला न्यायालयात हजर केले असता त्यास १८ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

अधिक वाचा  पुण्यात पुन्हा कोयता गँगचा धुमाकूळ; पोलिसांच्या गाडीसह 15 ते 20 वाहनांची तोडफोड