पुणे: टीव्ही मालिकेत अभिनेत्री म्हणून काम करण्याची संधी देण्याच्या बहाण्याने मुंबईतील एका तरुणीवर विमानतळ परिसरातील एका हॉटेलमध्ये निर्माता व दिग्दर्शकाने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एका महिलेसह तिघांवर विमानतळ पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मुंबईतील २८ वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. त्यानुसार भालचंद्र प्रमोद कोलवाडकर (रा. वर्धा रोड, पटवर्धन ग्राऊंड, नागपूर), समीर विजय चौधरी (रा. सरस्वती विहार, त्रिमुर्तीनगर, नागपूर) व छाया (पुर्ण नाव समजू शकले नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आठ ते नऊ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही मूळची अकोला येथील आहे. ती सध्या मुंबईतील अंधेरी येथे राहण्यास आहे. ती एका ब्युटी पार्लरमध्ये काम करते. त्या ठिकाणी तरुणीची छाया नावाच्या महिलेशी ओळख झाली. तिने पीडितेला टीव्ही मालिकेचे निर्माता व दिग्दर्शक तिच्या ओळखीचे आहेत. त्यांच्या ओळखीने टीव्ही मालिकेत अभिनयाची संधी मिळवून देईल, असे सांगितले. ऑडिशन देण्यासाठी छायाने तरुणीला कॅब करून पुण्यातील विमाननगर परिसरात आणले. विमाननगर येथील एका हॉटेलमध्ये तिची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
छाया व तरुणी एका खोलीमध्ये राहत होते. त्यावेळी तिने ऑडिशन घेण्यासाठी आलेल्या दोघांची ओळख करून दिली. पहिल्या दिवशी त्यांनी व्यवस्थित प्रश्न विचारले. त्यानंतर निघून गेले. दुसऱ्या दिवशी मध्यरात्री दोघेजण तरुणीच्या खोलीत आले. त्यांनी तरुणीच्या खोलीत मद्यपान केले. त्यानंतर तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. तरुणीने त्यांना नकार दिल्यानंतर दोघांनी तरुणीस मारहाण केली. दारूची बाटली तरुणीच्या हातावर मारुन तिला जखमी केली. त्यानंतर दोघांनी तिच्यावर बलात्कार केला.
रागाने बघितले म्हणून युवकाची हत्या
या प्रकारामुळे तरुणी घाबरली. त्यानंतर ती मुंबईला परतली. याप्रकरणी कुठेही वाच्यता केल्यास दोघांनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली. या धक्यातून सावरल्यानंतर तिने शनिवारी विमानतळ पोलिसांकडे शनिवारी तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल केला. विमानतळ पोलिसांनी प्रकार घडलेल्या हॉटेलमध्ये जाऊन पाहणी केली. तसेच, त्या ठिकाणी बुकींगच्या वेळी दिलेली ओळखपत्रे तरुणीला दाखविली. त्यावेळी तिने आरोपींना ओळखले. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक जे. सी. मुजावर हे अधिक तपास करीत आहेत.