भोपाळ : मध्य प्रदेशात सध्या राजकीय उलथापालथ घडवणाऱ्या घडामोडींसहीत करोनाच्या भीती नागरिकांची झोप उडवतेय. राज्यपालांकडून सोमवारी विश्वासदर्शक ठराव मांडण्याचा आदेश देण्यात आला आहे. परंतु, करोनाच्या धास्तीमुळे विधानभवनाचं कामकाज सुरू राहणार का? यावर मात्र अद्यापही प्रश्नचिन्हं कायम आहे. वेगवेगळ्या शहरांतून येणाऱ्या आमदारांची अगोदर करोना चाचणी केली जावी, यावरही राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झालीय. त्यामुळे, इथल्या कमलनाथ सरकारमधील आमदारांना ‘फ्लोअर टेस्ट’पूर्वी ‘करोना टेस्ट’ला सामोरं जावं लागू शकतं.
करोनामुळे विधानसभेचं सत्र पुढे ढकलण्यात येऊ शकतं, असे संकेत राज्याचे आरोग्य मंत्री तरुण भानोत यांनी दिले होते. यानंतर, रविवारी जयपूरहून भोपाळमध्ये दाखल होणाऱ्या आमदारांची अगोदर करोना चाचणी होईल, अशी चर्चा मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाल्याचं मंत्री पी सी शर्मा यांनी म्हटलंय. सोबतच, हरियाणा आणि बंगळुरूहून येणाऱ्या आमदारांचीही करोना चाचणी केली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
अपक्ष आमदार आणि मध्य प्रदेश सरकारचे मंत्री प्रदीप जयस्वाल यांनी कॅबिनेट बैठकीनंतर, सरकारकडे आवश्यक संख्याबळ असल्याचं वक्तव्य केलं. अद्याप राज्यात करोनाची भीती असल्यानं उद्या विश्वासदर्शक ठराव मांडला जाईल याची खात्री नसल्याचंही त्यांनी आवर्जुन सांगितलं.
यापूर्वी भानोत यांनीही ‘आमदारांची सुरक्षा हा महत्त्वाचा विषय आहे, हा काही राजकीय मुद्दा नाही’ असं म्हटलं होतं. आरोग्य मंत्री तरुण भानोत यांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत तज्ज्ञांशी चर्चा सुरू आहे. विधानसभेत दाखल होण्यापूर्वी प्रत्येकाची स्क्रिनिंग होईल, असंही त्यांनी म्हटलं. उल्लेखनीय म्हणजे, ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर आपला राजीनामा सोपवणारे काँग्रेसचे २२ बंडखोर आमदार सध्या बंगळुरूमध्ये आहेत. बंगळुरूमध्ये आत्तापर्यंत करोनाची १९ रुग्ण सापडलेत तर एकाचा मृत्यू झालाय.

अधिक वाचा  पंतप्रधान नरेंद्र मोदींची जम्मू काश्मीरसंबंधी मोठी घोषणा, म्हणाले ‘आता लवकरच संपूर्ण राज्याचा…’