‘माहेरची साडी’ या चित्रपटातून प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यांच्या कडा ओल्या करुन त्यांच्या मनात एक खास जागा मिळविलेली अभिनेत्री म्हणजे अलका कुबल- आठल्ये. सोशिक व आदर्श सून म्हणून त्यांची मराठी चित्रपटसृष्टीत ओळख निर्माण झाली. अलका कुबल यांनी समीर आठल्ये यांच्याशी लग्न केलं. समीर हे सिनेमॅटोग्राफर आहेत. कॅमेरासमोर असणाऱ्या अलका व कॅमेरामागे असणारे समीर यांच्यात प्रेम कसं जुळलं, हा अनेकांच्या कुतूहलाचा विषय आहे.
नुकताच अलका यांनी समीर यांच्यासोबतचा एक जुना फोटो पोस्ट केला. ‘जिथून सुरुवात झाली..’ असं कॅप्शन अलका यांनी या फोटोला दिलंय. हातात कॅमेरा धरलेले समीर व त्यांच्या बाजूला उभ्या असलेल्या अलका यांचा हा फोटो नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधून घेत आहे.
अलका व समीर यांनी चार ते पाच चित्रपटांसाठी एकत्र काम केलं. त्यादरम्यान त्यांचा एक ग्रुप तयार झाला. या ग्रुपमध्ये अलका व समीर यांची मैत्री झाली व हळूहळू या मैत्रीत प्रेमाची कळी खुलू लागली. दोघं अनेकदा जुहू चौपाटीवर फिरायला जायचे. एव्हाना समीर व अलका एकत्र आहेत हे सर्वांच्या नजरेत आलं होतं. एके दिवशी अलका यांच्या आईने त्यांना विचारलं, “तुम्ही दोघं एकत्र फिरता, लोक चर्चा करतात, नक्की तुमच्यात काय आहे?” हे ऐकून अलका जरा घाबरल्या. कारण तोपर्यंत दोघांपैकी कोणीच प्रपोज केलं होतं. कोण कोणाला पहिला विचारणार आणि पुढून उत्तर काय येणार याची भीती दोघांमध्ये होती. अखेर आईने तगादा लावल्यावर अलका यांनी पुढाकार घेतला आणि समीर यांना लग्नासाठी विचारलं. तेव्हा समीर यांनी लगेचच होकार दिला.
अलका यांच्या आईने सुरुवातीला या दोघांच्या लग्नाला नकार दिला होता. दोघंही एकाच क्षेत्रात कामाला असल्याने पुढे मतभेद झाल्यास नात्यावर परिणाम होणार अशी त्यांना भीती होती. पण समीर व अलका यांना त्यांच्या प्रेमावर खूप विश्वास होता. त्यांनी लग्नाचा निर्णय ठाम ठेवला. आता या दोघांना दोन मुली आहेत. कस्तुरी व ईशानी अशी त्यांच्या मुलींची नावं आहेत.