मुंबई: महाराष्ट्रात सर्वाधिक ३२ जणांना करोनाची लागण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून परिस्थितीची माहिती घेतली. तसेच करोनाचा मुकाबला करण्यासाठी केंद्राकडून सर्वोतोपरी सहाय्य करण्याचं आश्वासही त्यांनी दिलं असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोघांमध्ये आज दुपारी बोलणं झालं. सुमारे पंधरा मिनिटं या दोघांमध्ये बोलणं झाल्याचं सांगण्यात येतं. यावेळी मोदींनी राज्यातील करोनाची लागण झालेले रुग्ण, संशयित रुग्णांची माहिती घेतली. तसेच राज्य सरकारने बनविलेले विलगीकरण केंद्रांची माहिती घेतली. तसेच उद्धव ठाकरे यांनीही राज्य सरकारने करोना रोखण्यासाठी घेतलेल्या निर्णयांची पंतप्रधानांना माहिती दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. मात्र याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाने अद्याप अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
आता संपूर्ण राज्यात तलाव, जीम, सिनेमा-नाट्यगृहे बंद
दरम्यान, राज्यात आतापर्यंत ३२ रुग्ण आढळून आले असून, पुणे येथे १५, मुंबई ५, रायगड १, कल्याण १, अहमदनगर १, नागपूर ४, ठाणे १, यवतमाळ २, नवी मुंबई १ आणि औरंगाबाद १ असे एकूण ३२ रुग्ण आढळून आले आहेत. यापार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात ३१ मार्चपर्यंत नाट्यगृहे, सिनेमागृहे, जलतरण तलाव आणि व्यायामशाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सर्व प्रकारच्या सार्वजनिक कार्यक्रमांनाही परवानगी नाकारली असून नागरिकांना विनाकारण गर्दी न करण्याचं आवाहन केलं आहे. मुंबई पोलिसांनीही मुंबईत जमावबंदी आदेश लागू केले असून जमावबंदी आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाईचा इशारा दिला आहे.

अधिक वाचा  ‘तारीख ठरली! अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार? राणेंना बक्षीस अन् गोगावल्यांना पुन्हा फटकाच? नवी चर्चा सूरू