मुंबई: करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरला लागू करण्यात आलेले निर्बंध आता संपूर्ण राज्याला लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्यात ३१ मार्चपर्यंत नाट्यगृहे, सिनेमागृहे, जलतरण तलाव आणि व्यायामशाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. राज्य सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्रक पाठवून तसे आदेशच दिले आहेत.
मुंबई, पुणे, नागपूरसह राज्यात करोनाचे ३२ रुग्ण आढळले आहेत. राज्यातील दहा शहरांमध्ये करोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे करोनाच्या फैलावाची व्याप्ती पाहता राज्यसरकारने मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, नागपूरसाठी जे निर्बंध शुक्रवारी लागू केले होते. ते सर्व निर्बंध आता संपूर्ण राज्यांना लागू केले आहेत. त्यामुळे येत्या ३१ मार्चपर्यंत राज्यातली सर्व सिनेमा-नाट्यगृहे, व्यायामशाळा, तरण तलाव बंद राहणार आहेत. राज्य सरकारने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्रक पाठवून तसे आदेश दिले असून जिल्हाधिकाऱ्यांनीही तात्काळ हे निर्बंध लागू करत त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे.
औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनीही तसे आदेश दिले आहेत. जिल्ह्याातील चित्रपटगृहे, जलतरण तलाव, व्यायामशाळा, नाट्यगृहे, म्यूझियम ३१ मार्चपर्यंत बंद राहणार असून आठवडी बाजारही बंद ठेवण्याचे आदेश चौधरी यांनी दिले आहेत. पुण्यात जिल्हाधिकाऱ्यांनी कृष्णाई वॉटर पार्क बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. नगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनीही शहरातील जलतरण तलाव, व्यायामशाळा व नाट्यगृह ३१ मार्च पर्येंत बंद करण्याचे आदेश आज काढले.
दरम्यान, राज्यात आतापर्यंत ३२ रुग्ण आढळून आले असून, पुणे येथे १५, मुंबई ५, रायगड १, कल्याण १, अहमदनगर १, नागपूर ४, ठाणे १, यवतमाळ २, नवी मुंबई १ आणि औरंगाबाद १ असे एकूण ३२ रुग्ण आढळून आले आहेत.

अधिक वाचा  समता परिषदेच्या बैठकीतून छगन भुजबळांचा ओबीसी आंदोलकांना कॉल, पाठीशी असल्याचे दिले आश्वासन