मुंबई: कडक उन्हात करोनाचे विषाणू टिकणार नाहीत, असा दावा वैद्यकीय तज्ज्ञांनी केला असतानाच रविवारच्या उन्हाच्या तडाख्याने मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला. राज्यभरात करोनाचे रुग्ण वाढले असले तरी रविवारी मुंबईत एकही नवीन रुग्ण आढळला नाही. तपासण्यात आलेल्या ४३ रक्ताच्या नमुन्यांमध्ये सर्व निगेटिव्ह आहेत. त्यामुळे मुंबईतील आत्तापर्यंत बाधित रुग्णांची संख्या ५ व नवी मुंबई, ठाणे ४ असे एकूण ९ रुग्ण कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाच्या उपकार्यकारी अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी दिली.
मुंबईत करोनाचे ४५८ संशयित रुग्ण कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. यातील ३८० रुग्णांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. रविवारी दिवसभरात ४३ जणांचे रक्ताचे नमुने तपासण्यात आले. यातील एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळला नाही. त्यामुळे रविवार मुंबईकरांना दिलासा देणारा ठरला आहे. करोना प्रतिबंधासाठी राज्य सरकार व मुंबई महापालिकेची यंत्रणा सज्ज असून परदेशातून येणाऱ्या पर्यटकांची तपासणी करण्यासाठी विमानतळावर डॉक्टरांचे पथक २४ तास तैनात करण्यात आले आहे. विमानतळावर परदेशातून आलेल्या २ लाख ३० हजार पर्यटकांची आत्तापर्यंत तपासणी करण्यात आली असून, १५ मार्चपर्यंत ४५८ संशयित रुग्णांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यासाठी रविवारी १० हजार गृहनिर्माण सोसायट्या तपासण्यात आल्या. डॉक्टरांच्या पथकाने सोसायटीतील पदाधिकाऱ्यासोबत बैठक घेऊन त्यांना करोना प्रतिबंधासाठी मार्गदर्शन केले. जनजागृतीपर पत्रके, पोस्टर्स वाटप करण्यात आल्याची माहिती डॉ. दक्षा शाह यांनी दिली.
परदेशातून येणारी व्यक्ती व त्यांच्या निकट असलेल्या व्यक्ती अशा दोन माध्यमांतून सध्या भारतात करोनाचा प्रसार होत आहे. त्यामुळे जे परदेशातून प्रवास करून मुंबईत आले आहेत त्यांनी व त्यांच्या निकट असलेल्या व्यक्तींनी घरातच एका वेगळ्या खोलीत १४ दिवस थांबावे. मधुमेह, रक्तदाब असलेल्यांपासून तसेच गरोदर महिलापासून लांब राहावे. १४ दिवसांत किंवा नंतर सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे दिसल्यास तत्काळ कस्तुरबा रुग्णालयात तपासणी करून घ्यावी, असे डॉ. शाह यांनी सांगितले.
‘केईएम’ची लॅब सुरु होणार
पालिकेच्या ‘केईएम’ रुग्णालयातही कोरोनाची चाचणी करण्यात केली जाणार आहे. येत्या चार दिवसात केईएम मधील लॅब सुरू होणार आहे. या ठिकाणी पालिकेची अॅम्ब्युलन्स तैनात ठेवण्यात येणार आहे.
१० हजार सोसायट्यांमध्ये तपासणी
कोरोनाची जनजागृती आणि तपासणी करण्यासाठी पालिकेने कंबर कसली असून रविवार असतानाही पालिकेच्या १०६७ जणांच्या पथकाने मुंबईतील २४ विभागांत जाऊन १० हजार सोसायट्यांमधील व्यक्तींची तपासणी केली. यात डॉक्टर आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांचाही समावेश होता.
परदेशवारीमुळे कोरोनाची लागण
‘कस्तुरबात आढळलेल्या ९ रुग्णांपैकी ८ जणांना परदेशवारीत करोनाची लागण झाली आहे तर केवळ एका व्यक्तीला करोनाचा संसर्ग त्याच्या जवळच्या नातेवाईकामुळे झाला आहे. त्यामुळे करोनाची थेट लागण होण्याचे प्रमाण हे खूपच कमी आहे. त्यामुळे मुंबईकरांनी घाबरून जाऊ नये. योग्य ती काळजी घ्यावी, योग्य झोप, आहार घ्यावा. स्वच्छता पाळावी. त्यामुळे कोरोनाच्या प्रसाराला आळा बसेल’, असे डॉ. शहा यांनी सांगितले.