पुणे : ‘करोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये जमावबंदी लागू होण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ही शक्यता वर्तविली असून, संपूर्ण शहरात जमावबंदी लागू करायची की, विशिष्ट भागात याबाबतचा निर्णय सोमवारपर्यंत घेतला जाणार आहे.
‘खबरदारीचा उपाय म्हणून शहरात जमावबंदी लागू करण्याबाबत चर्चा सुरू आहे. विभागीय आयुक्त आणि पोलिस आयुक्तांशी चर्चा करण्यात येत आहे. संपूर्ण शहरात जमावाबंदी लागू करायची की विशिष्ट परिसरात करायची, यावर लवकरच निर्णय घेतला जाईल,’ असे जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले.
‘करोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, तरीही अनेक ठिकाणी गर्दी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. ही गर्दी होऊ नये यासाठी हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय जमावबंदीचे आदेश जारी केले जातात. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याच्यादृष्टीने खबरदारी म्हणून हे कलम लागू केले जाण्याची शक्यता आहे. जमावबंदी लागू झाल्यास चारपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मज्जाव केला जातो. फौजदारी दंडसंहिता १९७३मधील कलम १४४ अंतर्गत ही जमाबंदी लागू होते. त्याचे पालन न केल्यास संबंधितांना पोलिसांकडून अटक केली जाऊ शकते.

अधिक वाचा  मुख्यमंत्रि‍पदाची माळ फडणवीसांच्या गळ्यात, पण शिंदे-अजितदादांची मोठी खेळी, दिल्लीच्या बैठकीत ‘या’ मंत्रि‍पदांची मागणी?