सातारा: लोकप्रियतेची हवा डोक्यात शिरली की माणूस विक्षिप्त वागतो, अशा शब्दांत ‘चला हवा येऊ द्या’च्या टीमवर टीका करतानाच निलेश साबळे माफी मागा, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा भाजपचे खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी दिला आहे. तसेच या शोमध्ये छत्रपती शाहू महाजांच्या करण्यात आलेल्या अवमानाचाही त्यांनी निषेध नोंदवला आहे.
‘चला हवा येऊ द्या’मधील एका भागात या शोचे कलाकार छत्रपती शाहू महाराजांच्या वेषात दाखविले होते. त्यामुळे त्यावर शाहूप्रेमींनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. हा शाहू महाराजांचा अवमान असून या शोच्या कलाकारांनी माफी मागावी, अशी मागणी होत आहे. खासदार छत्रपती संभाजी राजे यांनीही या प्रकारावर ट्विटरद्वारे तीव्र शब्दांत भावना व्यक्त केल्या आहेत.
‘लोकप्रियतेची हवा डोक्यात घुसली की माणूस विक्षिप्त वागायला सुरू करतो. ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांच्या प्रतिमेचा चुकीच्या पद्ध्तीने वापर केला गेला आहे. हे आक्षेपार्ह तर आहेच, परंतु, निषेधार्ह सुद्धा आहे, असं संभाजी राजे यांनी म्हटलं आहे. ‘निलेश साबळे तसेच झी वाहिनीने या गैरकृत्याची जबाबदारी घेऊन जाहीर माफी मागावी. अन्यथा वाहिनी व दिग्दर्शकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
राजर्षी शाहु महाराजांचा अपमान; ‘चला हवा येऊ द्या’ वादात
आमचे घराणे कलेचे आश्रयदाते आहे. स्वतः शाहू महाराजांनी कोल्हापूरला कलानगरीमध्ये रुपांतरित केले. सयाजीराव गायकवाडांचे योगदानही कमी नाही. कलेसाठी स्वातंत्र्याची व पोषक वातावरणाची गरज असते. याचा अर्थ असा नाही की काहीही करावं. आम्हा सर्व इतिहासप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, असंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
निलेश साबळे तसेच झी वाहिनी ने गैरकृत्याची जबाबदारी घेऊन जाहीर माफी मागावी.अन्यथा वाहिनी व दिग्दर्शक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
११ मार्च २०२० रोजी प्रसारित झालेल्या ‘चला हवा येऊ द्या’च्या शोमध्ये राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराजे गायकवाड यांच्या प्रतिमांचा चूकीच्या पद्धतीनं वापर करण्यात आला. या दिवशाच्या खास कार्यक्रमात सुबोध भावे आणि दिग्दर्शक सुभाष घई यांनी ‘विजेता’चित्रपटाच्या प्रमोशनसाठी उपस्थिती लावली होती. यात छत्रपती शाहू महाराज आणि सयाजीराजे गायकवाड यांच्या प्रतिमेत भाऊ कदम आणि कुशल बद्रिके यांचा फोटो लावण्यात आला होता. त्यामुळं या प्रकारावर शाहूप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे.

अधिक वाचा  बिग बॉसच्या घरात सगळ्यांना गुलीगत धोका