अलीगड: उत्तर प्रदेशातील अलीगडमध्ये समलैंगितकेशी संबंधित एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. भाडेकरूच्या पत्नीसोबत समलैंगिक संबंध कायम राखता यावेत या कारणावरून घरमालक पत्नीने आपल्या पतीची हत्या केली. भाडेकरूची पत्नी आणि घरमालकिणीने हा हत्येचा कट रचला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हत्या झालेल्या घरमालकाचे नाव भूरीसिंह गोस्वामी असे आहे. तो अलीगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गांधी पार्कातील कुंवरनगरचा रहिवासी होता. गोस्वामी यांचा मृतदेह होळीच्या रात्री परिसरातील एका नाल्यात आढळला. मृतदेहाचे हात आणि पाय बांधलेले होते. गोस्वामी यांची हत्या गळा दाबून करण्यात आल्याचे शवविच्छेदनात स्पष्ट झाले आहे. होळीच्या दिवशी आपले पती पैसे वसूल करण्यासाठी गेले होते, मात्र ते परत आलेच नाहीत, अशी माहिती गोस्वामी यांच्या पत्नीने पोलिसांना दिली.
होळीच्या दुसऱ्या दिवशी गोस्वामी यांच्या भावाने पोलिसात तक्रार दाखल केली. या तक्रारीत त्याने आपल्या भावाचा खून भावाची पत्नी आणि भाडेकरूच्या पत्नीने मिळून केला असा आरोप केला आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची खोलात जाऊन चौकशी केल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. भूरी सिंह गोस्वामी यांची पत्नी रूबी हिचे त्यांचे भाडोत्री असलेल्या व्यक्तीच्या पत्नीशी समलैंगिक संबंध होते.
एका महिन्यात तयार केली योजना
आपल्या पत्नीचे समलैंगिक संबंध असल्याची माहिती गोस्वामी यांना मिळाल्यानंतर त्यांनी पत्नीला विरोध करायला सुरुवात केली. त्यानंतर गोस्वामी यांना आपल्या वाटेतून दूर करण्याचा दोघींनी कट आखला. एका महिन्यापासून या दोघी हा कट आखत होत्या. त्यानुसार होळीच्या दिवशी गोस्वामी यांना दारू पाजण्यात आली. त्यानंतर त्यांचा गाळा आवळून त्यांचे शव त्यांच्या भावाच्या घराबाहेर फेकून देण्यात आले. गोस्वामी यांचे शव त्यांच्या भावाच्या घराशेजारी सापडल्याने सारा संशय त्यांच्या भावावर जावा हा त्या मागचा उद्देश होता. या प्रकरणाचा खुलासा करत पोलिसांनी दोन्ही आरोपी महिलांना अटक केली. या महिलांकडून हत्येसाठी वापरण्यात आलेली रश्शी आणि टेप हस्तगत करण्यात आली आहे.

अधिक वाचा  एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळात ‘भाजप’चे नवे प्लॅनिंग! टीम राज्यमंत्री वेगळंच संकेत; नव्या मंत्रिमंडळाची यादी!