भोपाळः काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या ज्योतिरादित्य शिंदेंवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. काँग्रेस समर्थकांनी शिंदे यांच्या गाडीवर आणि ताफ्यावर जोरदार दगडफेक केली, असा आरोप मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे उपाध्यक्ष शिवराज सिंह चौहान यांनी केलाय. राज्यातील सत्तेतून बहुमत गमवल्याने बिथरलेली काँग्रेस आता हल्ले करत आहे, असं शिवराजसिंह चौहान म्हणाले.
भोपाळमध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांची गाडी रोखण्याचा प्रयत्न केला गेला. यातून ज्योतिरादित्य मोठ्या प्रयत्नांनी बाहेर पडले. त्यांच्यावर जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न केला गेला. या घटनेची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी शिवराजसिंहांनी केली. तसंच मध्य प्रदेशातील कायदा-सुव्यवस्था बिघडली असून अराजकता निर्माण झाली आहे, असा आरोप त्यांनी केला. ज्योतिरादित्य शिंदेंवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करतो. पोलिसांनी याप्रकरणी चौकशी करावी आणि यात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही शिवराजसिंहांनी केली.
भोपाळमधील कमला पार्क भागात ज्योतिरादित्य शिंदेंच्या ताफ्याला काँग्रेस समर्थकांनी घेरलं. यावेळी शिंदेंना काळे झेंडे दाखवण्यात आले. त्यांच्याविरोधात नारेबाजीही केली गेली. ‘गली-गली मे शोर है, ज्योतिरादित्य चोर है’, असे नारे देण्यात आले.

अधिक वाचा  देशी गायी आता ‘राज्यमाता-गोमाता’, शिंदे सरकारचा मास्टरस्ट्रोक?; खेळीमागचं कारण काय?