माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमनलाथ यांचा रावण असा उल्लेख करत काँग्रेसला टोला लगावला आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश करणाऱ्या ज्योतिरादित्य शिंदे यांचा विभीषण असा उल्लेख केला. लंका जाळण्यासाठी विभीषणची गरज लागते असंही यावेळी ते म्हणाले आहेत. काँग्रेस आणि कमलनाथ यांच्यावर निशाणा साधताना ते म्हणाले की, “काँग्रेस सोडून भाजपात आलेल्या ज्योतिरादित्यना आधी महाराज म्हणायचे आणि आता माफिया म्हणत आहेत. एका दिवसात ज्योतिरादित्य माफिया झाले का ?”.
भाजपात सहभागी झाल्यानंतर पहिल्यांदाच भोपाळमध्ये आलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांच्या स्वागतासाठी आयोजित सभेत बोलताना शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं की, “कमलनाथजी..आमच्या कार्यकर्त्याच्या प्रत्येक अश्रूचा हिशोब घेणार असं मी म्हटलं होतं”. कमलनाथ यांच्यावर जनता आणि भाजपा कार्यकर्त्यांवर अत्याचार केल्याचा आऱोप लावत त्यांनी सांगितलं की, “याचं (बंगला, हॉटेल, रिसॉर्ट) तोडून टाका, याला संपवून टाका. तुमच्या घरचं राज्य आहे का ? जर तुम्ही योग्य प्रकारे काम केलं असतं तर आम्ही रस्त्यावर उतरलो नसतो”.
पुढे ते म्हणाले की, “पण आज आम्ही संकल्प करतो की, कमलनाथजी जोपर्यंत तुमच्या पाप, अत्याचार, अन्याय, भ्रष्टाचार आणि दहशतीच्या लंकेला जाळून नष्ट करत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही”. यावेळी भाजपात प्रवेश केलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे पाहत त्यांनी म्हटलं की, “पण रावणाची लंका जाळायची असेल तर विभीषणाची गरज असते”.