नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्यसभेसाठी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मुंबईमध्ये विधानभवनात त्यांनी आपला अर्ज भरला. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील उपस्थित होते. राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करताना शरद पवार यांनी आपल्या शपथपत्रात आपल्या संपत्तीचाही उल्लेख केलाय. यामध्ये, गेल्या सहा वर्षांत शरद पवार यांची संपत्ती ६० लाखांनी वाढल्याचं दिसतंय.
शरद पवार यांची संपत्ती
शपथपत्रात शरद पवार यांनी आपली ३२.७३ करोड रुपयांची एकूण मिळकत जाहीर केली आहे. यामध्ये २५,२१,३३,३२९ रुपयांची जंगम आणि २,५२,३३,९४१ रुपयांच्या स्थावर मालमत्तेचा समावेश आहे.
तसंच, पवारांनी आपल्या एक करोड रुपयांचं ऋण असल्याचंही या शपथपत्रात नमूद केलंय. प्रतिभा पवार यांचा ‘ऍडव्हान्स डिपॉझिट’ म्हणून ५० लाख रुपये मिळाल्याचंही त्यांनी शपथपत्रात नमूद केलंय. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडून शेअर ट्रान्सफरसाठी हे पैसे मिळाल्याचं त्यांनी म्हटलंय.
तसंच हिंदू अविभाजीत कुटुंब नियमाप्रमाणे, शरद पवार यांना ‘ऍडव्हान्स डिपॉझिट’ म्हणून नातू – अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार याच्याकडून ५० लाख रुपये मिळाल्याचं त्यांनी शपथपत्रात नमूद केलंय.
२०१४ च्या राज्यसभा निवडणुकीदरम्यान दाखल केलेल्या शपथपत्रात पवारांनी २०,४७,९९,९७०.४१ रुपयांची जंगम मालमत्ता आणि ११,६५,१६,२९० रुपयांची स्थावर मालमत्ता अशी मिळून ३२.१३ कोटींची संपत्ती जाहीर केली होती.
दुसरीकडे मध्य प्रदेशात राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपनं राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा केलीय. भाजपकडून महाराष्ट्रातून उदयनराजे भोसले आणि आरपीआयचे अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना राज्यसभेत धाडण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
राज्यसभा निवडणूक प्रक्रिया
महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सात जागा रिकाम्या होत आहेत, त्याचीच निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. यासाठी १३ मार्च ही उमेदवारी दाखल करण्याचा करण्यासाठी शेवटची तारीख आहे. या उमेदवारी अर्जांची पडताळणी १६ मार्च रोजी होणार आहे. १८ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील.
महाराष्ट्रात एका आमदाराच्या मताचं मूल्य १०० मतं आहे. महाराष्ट्रात एकूण २८८ आमदार आहेत. या हिशोबानं २८,८०० मतं होतात. राज्यसभा निवडणूक जिंकण्यासाठी एका उमेदवाराला ३६०१ मतांची आवश्यकता असते. महाराष्ट्रातील राजकीय स्थिती पाहत भाजप ३, काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी एक सदस्य राज्यसभेत सहजच दाखल होऊ शकतील.
महाराष्ट्र विधानसभेचं संख्याबळ
भाजप – १०५
शिवसेना – ५६
राष्ट्रवादी – ५४
काँग्रेस – ४४
इतर – २९

अधिक वाचा  लक्ष्मण हाके अन् मनोज जरांगे आपसी विरोधाची भुमिका; ‘..जरांगे माझ्याशी बोलायची लायकी नाही’, टोकाचं वक्तव्य