लवकरच राज्यसभेच्या तब्बल ५५ जागा रिक्त होणार आहेत. परंतु काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजीव शुक्ला यांनी राज्यसभेची उमेदवारी नाकारली आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून यांची माहिती दिली. तसंच आपल्याला उमेदवारीबाबत विचारणा केली म्हणून त्यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे आभारही मानले आहे.
पुढील काही दिवसांमध्ये राज्यसभेच्या ५५ जागा रिक्त होणार असून त्यासाठी निवडणुका घेतल्या जाणार आहेत. काँग्रेसनं गुजरातमधून राज्यसभेसाठी राजीव शुक्ला यांच्या नावाचा विचार केला होता. परंतु त्यांनी आपल्या नावाचा विचार करू नये, असं पक्षश्रेष्ठींना सांगितलं आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. “राज्यसभेच्या निवडणुकीसाठी माझ्या नावाचा विचार केला त्याबद्दल सोनियाजींचे आभार. परंतु सध्या मला संघटनात्मक बांधणीकडे अधिक लक्ष द्यायचं आहे. त्यामुळे माझ्या नावाऐवजी अन्य व्यक्तीच्या नावाचा विचार करावा,” अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं आहे.
राज्यातून सातव यांना उमेदवारी
राज्यातील राज्यसभेच्या एका जागेसाठी काँग्रेसमध्ये अनेक जण इच्छुक असताना पक्षाने तरुण चेहरा व गुजरातचे प्रभारी राजीव सातव यांना उमेदवारी जाहीर केली. प्रियंका गांधी यांना राज्यसभेवर पाठवावे, अशी मागणी काँग्रेसजनांकडून करण्यात आली होती. पण प्रियंका या रिंगणात नसतील. मध्य प्रदेशातून दिग्विजय सिंग यांना फेरउमेदवारी देण्यात आली.
राज्यातील एका जागेसाठी काँग्रेसने राजीव सातव यांच्या नावाची घोषणा केली. मावळते खासदार हुसेन दलवाई यांच्यासह पक्षातील अनेक नेते इच्छुक होते. पक्षातील काही नेते दिल्लीत ठाण मांडून बसले होते. पण पक्षाने तरुण चेहरा व मराठवाडय़ातील इतर मागासवर्गीय समाजातील राजीव सातव यांना संधी दिली. सातव हे गेल्या लोकसभा निवडणुकीत हिंगोली मतदारसंघातून निवडून आले होते. पक्षांतर्गत गटबाजी आणि गुजरात राज्याची जबाबदारीमुळे त्यांनी लोकसभा निवडणूक लढण्याचे टाळले होते. राज्यसभेवर संधी देऊन पक्षाने सातव यांचा संसदेचा मार्ग मोकळा केला. प्रदेशाध्यक्षपद किंवा पक्षात अन्य महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली जाऊ शकते.
२०१७ मध्ये राजीव सातव यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने गुजरात विधानसभा निवडणुकीत चांगलं यश मिळवलं होतं. फेब्रुवारी २०१० ते डिसेंबर २०१४ या कालावधीत त्यांनी भारतीय युवा काँग्रेसचं अध्यक्षपदही भूषवलं होतं.

अधिक वाचा  महायुतीचे तीनही घटक पक्ष स्वबळावरच निवडणूक लढवण्याची दाट शक्यता; राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याचा दावा