केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचं नाव त्यांच्या मुलीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. दानवे यांची कन्या आणि माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या पत्नी संजना जाधव यांच्याविरोधात औरंगाबादमधील क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हर्षवर्धन जाधव यांच्या आई तेजस्विनी जाधव यांनी ही तक्रार दाखल केली आहे.
तेजस्विनी रायभान जाधव या मुलगा हर्षवर्धन जाधव, सून संजना जाधव आणि नातवासोबत समर्थनगर (औरंगाबाद) राहतात. जाधव कुटुंबियातील कुरबुरींची अनेक वेळा चर्चा होते. मात्र, गुरूवारी हा वाद थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला. माजी आमदार तेजस्विनी जाधव यांनी गुरूवारी अचानक क्रांती चौक पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी सून संजना जाधव यांच्याविरोधात तक्रार दाखल केली असून, घरगुती कारणावरून सूनेनं शिवीगाळ केली. त्याचबरोबर धमकी दिल्याचा आरोप केला आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी संजना जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
हर्षवर्धन जाधव आणि रावसाहेब दानवे वाद –
रावसाहेब दानवे आणि त्यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांच्यातील कौटुंबिक संबंध चांगलं नसल्याचं दिसून आलं आहे. हर्षवर्धन जाधव यांनी अनेक वेळा रावसाहेब दानवेंवर टीका केली आहे. काही दिवसांपूर्वीचं त्यांनी दानवे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. दानवे यांनी चकवा दाखवत कन्नड पंचायत समितीचे सदस्य फोडल्याचा गंभीर आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केला होता. त्यांच्या आरोपामुळे राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या होत्या.
काय म्हणाले होते हर्षवर्धन जाधव?
“रावसाहेब दानवे यांनी माझे पंचायत समितीचे सदस्य फोडले. सभापतीच्या निवडणुका झाल्या. माझ्या स्वतंत्र असलेल्या रायभान जाधव विकास आघाडीच्या पाच सदस्यांना मी रूबेना कुरेशी यांना सभापती पदी आणि बनकर यांना उपसभापती पदी निवडण्याचे आदेश सदस्यांना दिले होते. मात्र, त्यातील चार सदस्य भाजपानं पळवून नेली. भाजपानं स्वतःच्या एकाला सभापती केलं आहे. हा प्रकार घृणास्पद आहे. यावरून भाजपाची मस्ती अजूनही जिरलेली दिसत नाही. त्यामुळे या गोष्टीचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. या सगळ्या घटनाक्रमात ज्यांना जालन्याचा चकवा असं म्हटलं जातं, ते भाजपाचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी यात मोठा सहभाग घेतला असल्याचं मला स्पष्टपणे जाणवत आहे. कारण त्यांनी सहभाग घेतला नसता, तर ही चार माणसं कधीच गळाला लागली नसती. कुठेतरी घरातूनच द्रोह झाल्याचं माझं स्पष्ट मत आहे. या आरोपाच खंडन दानवे केलं, तरी रायभान जाधव कुटुंबाला आणि कन्नड तालुक्यातील जनतेला चकवा दिलेला आहे, असा आरोप मी केला तर काहीही चुकीचं नाही,” असा आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केला होता.

अधिक वाचा  अनुराग कश्यपला 15 मिनिटांसाठी भेटायचं असेल तर द्यावे लागतील इतके रुपये; शेअर केली पोस्ट