मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताचं नाव मीटू चळवळीमुळे सर्वांच्याच लक्षात राहिलं. या चळवळीत तिनं नाना पाटेकरांविरोधात तक्रार नोंदवली होती. दरम्यान, या सर्व प्रकरणातून पाटेकरांना क्लिनचीट मिळाली आहे. आता पुन्हा एकदा तनुश्री लाइमलाइटमध्ये आली आहे. तनुश्रीनं नानांवर आरोप करताना त्यांची सामाजिक संस्था ‘नाम फाऊंडेशन’वरही आरोप केले होते. या प्रकरणी न्यायालयानं तनुश्रीला दणका दिला असून तिची कानउघडणी केली आहे.
‘नाना पाटेकर म्हणजे दुसरा आसाराम बापू, असा उल्लेख करत तनुश्रीनं नाना पाटेकर यांच्यावर टीका केली होती. नाना पाटेकर यांच्याकडून विनयभंग झाल्याच्या प्रकरणात मी पीडित असताना त्या काळात बॉलीवूडमधील काही लोकांनी जाणीवपूर्णक माझ्याविरोधात खूप बदनामीकारक माहिती पसरवली. त्यामुळं माझे करिअर उद्ध्वस्त झालं. नाना पाटेकर हे ढोंगी आहेत. शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या नावाखाली आणि पूरपीडितांसाठी पाचशे घरे निर्माण करण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा निधी त्यांनी नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून देश-परदेशांतून जमवला. मात्र, त्याचा वापर कसा आणि कुठे केला, हे कोणी तपासलं का? कोणी त्याविषयीची कागदपत्रं तपासतं का? गरीब शेतकऱ्यांच्या नावाखाली त्यांच्याकडून भ्रष्टाचार होत आहे, असा गंभीर आरोपही तनुश्रीने केला होता.
‘नाम फाऊंडेशन’ टीका केल्या याप्रकरणी न्यायालयानं तनुश्रीला समजावलं असून या सामाजिक संस्थेची बदनामी होईल अशी वक्तव्य न करण्याची ताकीद दिली आहे. तसंच ‘नाम फाऊंडेशन’कडून २५ कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्यात आला आहे. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. तनुश्रीची बाजू मांडण्यासाठी न्यायालयात तिचे वकीलही उपस्थित नव्हते. यामुळं नाना पाटेकर यांच्या संस्थेला काहीसा दिलासा मिळाला आहे.
काय आहे प्रकरण?
सुमारे दहा वर्षांपूर्वी ‘हॉर्न ओके प्लीज’ या हिंदी चित्रपटातील एका गाण्याच्या चित्रिकरणावेळी नाना पाटेकर यांनी आपला विनयभंग केला, अशी तक्रार तनुश्रीनं केल्यानंतर ओशिवरा पोलिसांनी पाटेकर यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला. मात्र, तनुश्रीच्या आरोपांत तथ्य नसल्याचा अहवाल पोलिसांनी गेल्या वर्षी जूनमध्ये न्यायालयात सादर केला.

अधिक वाचा  महाराष्ट्राला वेध विधानसभा निवडणुकीचे! निवडणूक आयोगाची तयारीची तारीख जाहीर