पुणे: दुबई-पुणे स्पाइसजेट विमानातून आज पहाटे १२९ प्रवासी आले असून या सर्व प्रवाशांची विमानतळावरच वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या तपासणीत एकाही प्रवाशामध्ये करोनाची लक्षणे आढळून आलेली नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
स्पाइसजेट एअरलाइन्सचे दुबई-पुणे हे विमान (क्र. एसजी-५२) पुणे विमानतळावर पहाटे ४ वाजून ५ मिनिटांनी उतरले. या विमानात ७४ पुरुष, ४१ महिला, १४ लहान मुले असे एकूण १२९ प्रवासी होते. त्यात ११८ भारतीय नागरिक तर ११ परदेशी नागरिक होते. या सर्व प्रवाशांची तपासणी करण्यात आली. त्यात करोना संशयित एकही रुग्ण आढळलेला नाही, असे पुढे नमूद करण्यात आले.
विमानातील एका २६ वर्षीय महिलेने तिला व तिच्या एक वर्षाच्या बाळाला कफ असल्याचे सांगितले. त्यामुळे या दोघांनाही नायडू रुग्णालयात अधिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. अन्य प्रवाशांना घरी सोडण्यात आले असून घरात पुढील काही दिवस इतरांपासून वेगळं राहण्याची सूचना देण्यात आली आहे. पुणे जिल्हा प्रशासन, पुणे विमानतळ व्यवस्थापन, वैद्यकीय पथक आणि पोलीस प्रशासन यांच्या मदतीने ही तपासणी व अन्य कार्यवाही करण्यात आली.
दरम्यान, १५ फेब्रुवारी २०२० नंतर ते आजमितीपर्यंत चीन, इटली, इराण, दक्षिण कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनी या देशांतून प्रवास करून पुण्यात आलेले कोणीही नाहीत, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
परदेशी नागरिकांची माहिती द्या
पुणे जिल्हा प्रशासनाकडून करोनाचा फैलाव रोखण्यासाठी सर्व प्रकारची खबरदारी बाळगण्यात येत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांत गेल्या एक महिन्यापासून परदेशातून आलेले किती नागरिक हॉटेलमध्ये उतरले होते, याची माहिती हॉटेलचालकांनी एका दिवसांत देण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने माहिती संकलित करण्याचा नमुना तयार केला असून, त्या माहितीच्या आधारे प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जाणार आहेत.

अधिक वाचा  ‘इंडिया’ची पहिली सभा ‘या’ कारणामुळेचं रद्द; एक पाऊल मागे: शिवराज सिंह यांचाही मोठा आरोप