मुंबई: महाराष्ट्रात करोनाच्या रुग्णांची संख्या ११ झाली असून या सर्व रुग्णांमध्ये लक्षणे कमी प्रमाणात जाणवत आहेत. त्यामुळे काळजी करण्यापेक्षा काळजी घेणे महत्त्वाचे आहे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी केले.
केंद्र सरकारच्या सूचनेनुसार चीन, इराण, इटली, द. कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनी या सात देशांमधून प्रवास केलेल्यांना इतरांपासून वेगळे ठेवण्यात यावे. राज्यभरातील पर्यटनस्थळे, तीर्थस्थळे येथे गर्दी नियंत्रण करतानाच जनजागृती व्यापक प्रमाणात करावी. यात्रा, सरकारी कार्यक्रम पूर्णपणे रद्द करावेत. जे परदेशातून प्रवास करून आले आहेत, त्यांनी १४ दिवसांपर्यंत घरीच थांबावे. आंतरराष्ट्रीय विमानतळे असलेल्या शहरांमध्ये विलगीकरणाची सुविधा तातडीने निर्माण करावी. जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्यसेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पुरेशा प्रमाणात मास्क उपलब्ध आहेत याचा आढावा घ्यावा. प्रत्येक शहरातील टूर ऑपरेटर्सनी परदेश प्रवास केलेल्या आणि सध्या परदेशात असलेल्या प्रवाशांची यादी प्रशासनाला द्यावी, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी जिल्हा प्रशासनाला दिल्या.
करोनाबाबतचा राज्यव्यापी आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातून सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. महाराष्ट्रात करोनाचे रुग्ण आढळले मात्र त्यांच्यात गंभीर लक्षणे आढळून आलेली नाहीत. त्यामुळे या विषाणूची तीव्रता कमी झाली असेल तर समाधानाची बाब आहे. मात्र या विषाणूची उत्पत्ती स्थानिक नाही. परदेशी गेलेल्या पर्यटकांच्या माध्यमातून त्याचा फैलाव झाला आहे. कालपासून राज्यात तपासणी अधिक तीव्र करण्यात आली असून विविध देशांच्या दुतावासांशी देखील चर्चा केली जात आहे. नागरिकांनी घाबरून तपासणीसाठी रांगा लावू नये. जी मुख्य शहरे आहेत तेथील टूर ऑपरेटर्सनी शहरातील परदेशी गेलेल्या पर्यटकांची माहिती जिल्हा प्रशासनाला दिली पाहिजे. जे पर्यटक परतणार आहेत त्यांनी स्वत:हून घरीच १५ दिवस स्वतंत्र राहावे. कुटुंबात अथवा समाजात मिसळू नये असा संदेश द्यावा, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
राज्यस्तरावर याबाबत दर दोन तासांनी आढावा घेत असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले की, चाचणी करण्याची सुविधा केंद्र शासनाच्या मान्यतेने केली जाते. त्यामुळे केंद्र शासनाने परवानगी दिल्यानंतर प्रयोगशाळेला मंजुरी दिली जाईल. पर्यटनस्थळे, धार्मिक ठिकाणे येथे गर्दी नियंत्रण करताना व्यापक प्रमाणावर जनजागृती करावी. करोनाचे संकट उंबरठ्यापर्यंत आले आहे मात्र त्याला आत येऊ न देण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूया, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

अधिक वाचा  शरद पवारांचा अचंबित उत्साह! विधानसभेची ‘पेरणी’ सुरू; 3 दिवसात तब्बल 11 शेतकरी जाहीर मेळावे घेणार