राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोठया घरची पोरं निष्ठा, भक्ती, श्रद्धा, विचारधारा भरलेल्या ताटातील लोणच्यासारखं तोंडाला लावतात असं म्हटलं आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत हे वक्तव्य केलं आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये कोणाचाही उल्लेख केला नसला तरी हा अप्रत्यक्षपणे काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश करणाऱ्या ज्योतिरादित्य शिंदे यांना टोला असल्याचं बोललं जात आहे.
काय म्हटलं आहे ट्विटमध्ये –
“निष्ठा, भक्ती, श्रद्धा, विचारधार, मोठ्या घरची पोरं भरलेल्या ताटातील लोणच्यासारखं तोंडाला लावतात. रातोरात गांधींच्या मांडीवरुन गोडसेंच्या मिठीत विसावतात,” असं जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. पुढे त्यांनी लिहिलं आहे की, “आपण मनापासून जिंदाबाद, मुर्दाबादचे नारे लावूयात. आणि म्हणू या नंगा ही तो आय़ा था क्या कपडा लेके जायेगा”.
काँग्रेसला सोडचिठ्ठी देत मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकार संकटात आणणाऱ्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर भाजपने शिंदे यांना मध्य प्रदेशातून राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली. सव्वा वर्षांपूर्वी मध्य प्रदेशात सत्ता स्थापन करणाऱ्या काँग्रेसला ज्योतिरादित्य यांनी मंगळवारी जोरदार धक्का दिला. शिंदे आणि त्यांच्या समर्थक २२ आमदारांनी राजीनामा दिल्याने कमलनाथ सरकार संकटात सापडले. अपेक्षेप्रमाणे शिंदे यांनी बुधवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. ज्योतिरादित्य हे आपल्या कुटुंबात परतत असून, आम्ही त्यांचे स्वागत करतो, असे नड्डा या वेळी म्हणाले.

अधिक वाचा  पुणे कोथरूडमध्ये ‘झिका’चा झपाट्याने प्रसार?;  ३५१ रुग्णांचे नमुने; सर्वाधिक धोका या महिलांनाच