पिंपरी: करोना व्हायरसची माहिती ऑनलाइन शोधणाऱ्या अनेकांना सायबर चोरट्यांनी दणका दिला आहे. ‘करोना विषाणूची माहिती ऑनलाइन शोधताना करोना व्हायरस मॅप उघडणाऱ्या काही जणांच्या संगणकातील माहिती व विविध पासवर्ड चोरीला जात आहेत. यामुळे करोना व्हायरसचा मॅप उघडू नका,’ असे आवाहन पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर शाखेने केले आहे.
करोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातही ‘करोना’चे रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या धक्‍क्‍यातून नागरिक सावरलेले नाही. जगात कोणत्या देशात ‘करोना’चे रुग्ण अधिक आहेत, याची माहिती अनेक जण संगणकावरून घेत असल्याचे दिसून आले आहे. याचाच फायदा सायबर चोरट्यांनी घेतला आहे. त्यांनी करोना व्हायरसचा नकाशा ऑनलाइन टाकला आहे. हा नकाशा उघडताच संगणकातील माहिती सायबर चोरटे काढून घेत आहेत. त्यात पासवर्डसह डेटाही चोरला जात आहे. यामुळे करोना व्हायरस मॅप हा नकाशा कोणीही उघडू नका किंवा डाउनलोडही करू नका, असे आवाहन पिंपरी- चिंचवड पोलिसांच्या सायबर शाखेचे वरिष्ठ निरीक्षक सुधाकर काटे यांनी केले आहे.

अधिक वाचा  या देशात याकूब मेमनच्या दफनासाठी जागा मिळते, पण अक्षयला… आरोपीच्या वकिलाची खदखद काय?