इराणमध्येही मोठ्या प्रमाणात करोनानं गंभीर रूप धारण केल्याचं पाहायला मिळत आहे. इराणच्या उपपंतप्रधानांसह तब्बल २५ खासदारांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, करोनाची लागण झालेल्या इराणच्या तीन खासदारांचा मृत्यू झाला आहे.
चीन, इटलीनंतर इराणमध्ये मोठ्या प्रमाणात करोनाचे रूग्ण आढळले आहेत. इराणच्या उपपंतप्रधानांसह २५ जणांना करोनाची लागण झाली आहे. यापैकी तीन खासदारांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. इरणानी लॉमकर, फतेमेह रहबर आणि मोहम्मद मीर मोहम्मदी यांचा करोनानं मृत्यू झाला आहे. दरम्यान, यानंतर इराण सरकारनं याचा मोठा धसका घेतला आहे. तसंच सरकारनं सर्व यंत्रणांना हायअलर्टवर ठेवण्यात आलं आहे.
इराणमध्ये भारतीय अडकले
इराणच्या निरनिराळ्या भागांत ६ हजारांहून अधिक भारतीय नागरिक असल्याची माहिती परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दिली. यात प्रामुख्याने लडाख व जम्मू- काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील तसेच महाराष्ट्रातील सुमारे ११०० यात्रेकरूंचा समावेश आहे. याशिवाय प्रामुख्याने जम्मू व काश्मिरातील सुमारे ३०० विद्यार्थी; केरळ, तमिळनाडू व गुजरातमधील सुमारे १ हजार मच्छीमार, तसेच उदरनिर्वाहासाठी आणि धार्मिक अभ्यासासाठी इराणमध्ये दीर्घकालीन वास्तव्य करून असलेल्या इतर लोकांचा समावेश आहे, असे जयशंकर म्हणाले.
अमेरिकेत ३१ बळी, रुग्ण हजारांवर
अमेरिकेत करोना विषाणूने घेतलेल्या बळींची संख्या आता ३१ झाली असून संसर्ग असलेल्या रुग्णांची संख्या हजारावर गेली आहे. देशाच्या तीस राज्यात विषाणूचा प्रसार झाला असून अनेक राज्यांनी आणीबाणी जाहीर केली आहे. न्यूयॉर्कमध्ये राष्ट्रीय सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. एकूण रुग्णांची संख्या आता १०३७ झाली असल्याची माहिती जॉन हॉपकिन्स केंद्राने दिली आहे.