पुणे – महापालिकेच्या मालकीच्या असलेल्या परंतु भाडेतत्त्वावर दिलेल्या अनेक सदनिकांचे थकीत भाड्याच्या रकमेतील 70 लाख 51 हजार रुपयांची वसुली महापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाने केली आहे. वास्तविक ही थकबाकी कोट्यवधी रुपये असून ती भरारी पथकाद्वारे वसूल केली जाणार आहे.
महापालिकेचे उत्पन्न वाढण्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न करावे लागणार आहेत. पालिकेच्या अनेक मालमत्ता भाडेतत्त्वावर दिलेल्या आहेत. त्यामध्ये सदनिका आणि व्यापारी गाळ्यांचा समावेश आहे. मात्र, त्याचे भाडेच वसूल होत नाही. हे थकीत भाडे कोट्यवधी रुपयांचे आहे. ही थकबाकी वसूल केली तर उत्पन्नात भर पडू शकते. त्या दृष्टीने मालमत्ता व्यवस्थापन विभागाने दोन भरारी पथके तयार केली आहेत त्यांच्या माध्यमातून थकबाकी वसुलीला सुरुवात करण्यात आली आहे.
ही पथकांनी जागेवर जाऊन, तपासणी करून नोटिसा बजावल्यानंतर अवघ्या चार महिन्यांत 70 लाख 51 हजार रुपये थकबाकी वसूल केली. त्याचवेळी वापराविना पडून असलेल्या 219 सदनिका सील करण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या मालमत्ता विभागाच्या वतीने उभारण्यात आलेल्या वास्तूंमधील व्यावसायिक गाळे तसेच आर-सेव्हन या नियमाअंतर्गत महापालिकेच्या ताब्यात आलेल्या विविध स्किममधील सदनिकाही भाडेतत्त्वावर देण्यात आल्या आहेत. यांचेही भाडे मागील काही वर्षांपासून थकले असल्याने अंदाजपत्रकामध्ये त्याचे प्रतिबिंब उमटत असल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर मालमत्ता विभागाचे उपायुक्त राजेंद्र मुठे यांनी मागील पाच महिन्यांपासून ही थकबाकी वसुलीसाठी विशेष मोहीम आखली आहे. या साठी तीन ते चार कर्मचारी आणि अधिकाऱ्याची दोन भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. या भरारी पथकांनी पहिल्या टप्प्यात महापालिकेच्या सदनिकांवर लक्ष केंद्रीत केले आहे.
मिळकतकर आणि पाणीपट्टीही थकीत…
महापालिकेच्या विविध विभागांच्या थकबाकीच्या रकमा मोठ्या प्रमाणावर आहेत. यामध्येही मिळकतकर विभाग आणि पाणीपट्टीची थकबाकी ही जवळपास पाच हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. यापैकी बरीच प्रकरणे दुबार नोंदणी, चुकीच्या नोंदी यामुळे मिळकतकर आणि पाणीपट्टी रखडली असून, त्यावरील दंडामुळे ही रक्कम वाढत चालली आहे. तर, अनेकांनी न्यायालयात आव्हान दिल्याने वसुलीमध्ये अडचणी असल्याचे अनेकदा या विभागांकडून सांगण्यात येते.
व्यापारी गाळ्यांचीही वसुली…
पुढील टप्प्यात व्यावसायिक गाळ्यांच्या थकबाकीसाठी मोहीम हाती घेण्यात येणार आहे. मागील तीन महिन्यांत झालेल्या दोन महालोक अदालतीमध्ये व्यावसायिक संकुलातील भाडेकरूंकडून 64 लाख रुपये थकबाकी वसूल झाले आहे. येत्या काही दिवसांमध्ये महालोक अदालत आयोजित केली जाणार असून यामध्ये मुंढवा येथील गोठेधारक तसेच हडपसर येथील गाळेधारकांकडील सुमारे 6 कोटी रुपयांची थकबाकीची प्रकरणे ठेवण्यात येणार असल्याचे मालमत्ता आणि व्यवस्थापन विभागाचे उपअधीक्षक आशिष चव्हाण यांनी सांगितले.