येत्या २६ मार्च रोजी राज्यसभेच्या महाराष्ट्राच्या सात जागा रिक्त होणार आहेत. भाजपाच्या वाट्याला यापैकी तीन जागा येणार आहेत. यापेकी दोन जागांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. यापैकी एका जागेवर उदयनराजे भोसले तर दुसऱ्या जागेसाठी रामदास आठवले यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे. तर एका जागेवरील नावासाठी अद्याप निर्णय झालेला नाही. यावर बोलताना भाजपाचे खासदार संजय काकडे यांनी तिसरं नाव आपलंच असेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
भाजपाकडून राज्यसभेवर जाणाऱ्या दोन नावांची घोषणा झाली आहे. परंतु एक जागा बाकी आहे. त्यामुळे तिसऱ्या जागेसाठी माझ्या नावाचा विचार होईल, असं मत संजय काकडे यांनी व्यक्त केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर आपला विश्वास असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
संजय काकडे हे अपक्ष खासदार असून २०१४ मध्ये त्यांनी भाजपाची वाट धरली होती. २०१४ मध्ये भाजपा सत्तेत आल्यानंतर त्यांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान भाजपाने बुधवारी नऊ राज्यांमधील राज्यसभा उमेदवारांची नावं जाहीर केली. यामध्ये असाम (भुवनेश्वर कालीता), बिहार (विवेक ठाकूर), गुजरात (अभय भारद्वाज, रमीलाबेन बारा), झारखंड (दीपक प्रकाश), मणिपूर (लिएसेंबा महाराजा), मध्य प्रदेश (ज्योतिरादित्य शिंदे, हर्ष सिंह चौहान), महाराष्ट्रातून (उदयनराजे भोसले, रामदास आठवले), राजस्थान (राजेंद्र गहलोत) यांचा समावेश आहे. सध्या महाराष्ट्रातील एका जागेसाठी अद्याप निर्णय झालेला नाही.

अधिक वाचा  ‘ओबीसी’ने घाबरू नये; ‘सगेसोयरे’चा अध्यादेश काढणार: फडणवीसांनी २०१७ सालीच कायदा केलाय: मंत्री पाटील