करोना वायरसमुळे आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्यात यावी, याबाबत महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात चर्चा करण्यात आली आहे. आज महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात झालेल्या बैठकीत आयपीएलच्या तिकीच विक्रीवर बंदी घालण्यात यावी, असा निर्णय राज्य सरकाने घेतल्याचे सूत्रांनी सांगितले होते. पण आता आयपीएल पुढे ढकलण्यावरही महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात चर्चा झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे जर आयपीएल पुढे ढकलली गेली तर बीसीसीआयला मोठा आर्थिक फटका बसू शकतो, असे म्हटले जात आहे.
आयपीएलचे सामने बघण्यासाठी एकावेळी जवळपास ५० हजार लोकं एकत्र जमतात. करोनाच्या वातावरणात अशा क्रिकेट सामन्यांचं आयोजन करण्याची सरकारची इच्छा नाही. या विषयावर आज कॅबिनेटमध्ये प्रदीर्घ चर्चा करण्यात आली. त्यात दोन पर्यायांवर चर्चा करण्यात आली. आयपीएलचे सामने व्हावेत, पण तिकिट विक्री करण्यात येऊ नये. तिकिट विक्रीशिवाय सामने भरवण्यात यावेत. लोकांनी घरीच बसून थेट प्रक्षेपण पाहावं हा एक पर्याय समोर आहे. आयपीएलचे सामने पुढे ढकलण्याचा दुसराही पर्याय आहे. त्यावरही विचार झाला. कारण रिकाम्या स्टेडियममध्ये क्रिकेट खेळणं खेळाडूंनाही प्रोत्साहन देणारं ठरणार नाही. त्यामुळे या दोन्ही पर्यायांवर चर्चा झाली असून त्यावर लवकरच निर्णय घेण्यात येईल, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.
यापूर्वी टोपे यांनी आयपीएल पुडे ढकलण्यात यावी, असे संकेत दिले होते. या विषयावर आज महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात चर्चा करण्यात आली. आता आयपीएल पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकार घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले असेल.
करोना वायरसमुळे आयपीएल पुढे ढकलणार का, याबाबत महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले होते की, ” करोना वायरसमुळे मोठे मोठे कार्यक्रम रद्द होताना दिसत आहेत. आपणा सर्वांसाठी माणूस हा फार महत्वाचा आहे. बरीच माणंस एकत्र आली तर हा वायरस जास्त प्रमाणात वाढू शकतो. त्यामुळे जिथे जास्त लोकं एकत्र येतील, असे कार्यक्रम आपल्याला टाळायला हवेत. त्यामुळे आयपीएल ही स्पर्धा पुढे ढकलण्याची चर्चा किंवा याबाबतचा निर्णय होऊ शकतो.”
आज महाराष्ट्रातील वरिष्ठ मंत्र्यांची एक बैठक झाली. या बैठकीमध्ये हा निर्णय घेतला गेला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये आयपीएलची तिकीट विक्री होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. पण याबाबत महाराष्ट्र सरकारने दुजोरा दिलेला नाही किंवा अधिकृत घोषणाही केलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील चाहत्यांना आता आयपीएलचे सामने स्डेटियममध्ये जाऊन पाहता येणार नाही.