मुंबई: ‘उद्धव ठाकरे यांना काँग्रेस-राष्ट्रवादीनं घेरलं आहे. त्यांना निर्णय घेताना अडचणी येत आहेत. त्यामुळं ते महायुतीमध्ये परत येतील आणि महाराष्ट्रात मध्य प्रदेशची पुनरावृत्ती होईल,’ असा विश्वास रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.
मध्य प्रदेशातील राजकीय भूकंपाच्या पार्श्वभूमीवर ते मीडियाशी बोलत होते. ‘मध्य प्रदेशप्रमाणे महाराष्ट्र, राजस्थान आणि छत्तीसगडमध्येही सत्ताबदल होईल. महाराष्ट्रात पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार येईल,’ असं आठवले म्हणाले. महाविकास आघाडी सरकारबद्दल बोलताना ते म्हणाले, ‘उद्धव ठाकरे प्रचंड काळजीत आहेत. सरकारमध्ये निर्णय घेताना त्यांना अडचणी येत आहेत. त्यामुळं ते परत येतील. मात्र, ते परत आले नाही तरी त्यांचे आमदार आमच्याकडं येतील व भविष्यात आमचं सरकार येईल.’
मध्य प्रदेश काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह १९ आमदारांना फोडून भाजपनं काँग्रेसला जोरदार धक्का दिला आहे. भाजपच्या या खेळीमुळं मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकार कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे. या घडामोडींनंतर महाराष्ट्रातही भाजप अशाच पद्धतीचं ऑपरेशन राबवणार असल्याची चर्चा आहे. भाजप नेते व समर्थकांकडून तशी सूचक वक्तव्य केली जात आहेत. आठवले यांनीही त्यांच्याच सुरात सूर मिसळला आहे.

अधिक वाचा  देवा भाऊ.. लाडकी बहीण योजनेच्या बॅनरवरून अजित पवारांचा फोटो गायब, महायुतीतील धूसफूस कायम ?