पुणे : सध्याच्या स्मार्ट युगात स्मार्ट फोन हा बहुतेकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. त्यामुळेच स्मार्ट फोन घरी विसरल्यास अस्वस्थतेचे प्रमाण वाढते आहे. स्मार्ट फोन वापरण्यास मिळाला नाही, तर पुरुषांपेक्षा स्त्रिया अधिक अस्वस्थ होतात. स्मार्ट फोन घरीच विसरल्यास ७३ टक्के स्त्रिया आणि ६४ टक्के पुरुष अस्वस्थ होतात. ७२ टक्के स्त्रिया आणि ६० टक्के पुरुष स्मार्ट फोनशिवाय जगू शकत नसल्याचे मान्य करतात, असे एका सर्वेक्षणातून दिसून आले आहे. इतकेच नव्हे तर सर्वेक्षणात सहभागी झालेल्या पुण्यातील ८९ टक्के व्यक्तींसाठी स्मार्ट फोन हाच टीव्ही बनला आहे.
‘नॉर्टनलाइफलॉक’ या ग्राहक सायबर सुरक्षेतील कंपनीने केलेल्या सर्वेक्षणावर आधारित ‘इंडिया डिजिटल वेलनेस रिपोर्ट’मधून या गोष्टी समोर आल्या. पुण्यासह भारतातील काही महत्त्वाच्या शहरांमधील १,५०० व्यक्तींचा या सर्वेक्षणात सहभाग होता.
खासगीपणा आणि डेटा सुरक्षेच्या संदर्भात विचार करता मिलेनिअल्स (९४ टक्के) आणि जनरेशन एक्सच्या (९० टक्के) तुलनेत जनरेशन झेड (९५ टक्के) आपल्या फोनवरील खासगीपणा जपण्याबाबत (अॅप परमिशन) अधिक दक्ष आहेत. सुरक्षेच्या धोक्यांसंदर्भात पुरुषांच्या तुलनेत (७४ टक्के) महिला (८४ टक्के) अधिक जागरूक आहेत. महिला त्यांच्या स्मार्ट फोनमध्ये सिक्युरिटी अॅप्लिकेशन्सही वापरतात. सर्वेक्षणात सहभागी असलेल्या ९४ टक्के महिलांना खासगीपणा जपणाऱ्या परवानग्यांची हाताळणी कशी करायची, याची माहिती असते. ५० टक्के महिलांनी त्यांचे सर्व पासवर्ड ‘सेव्ह’ करण्याची परवानगी ब्राउझरला दिलेली आहे. यात महानगरांमधील स्त्रियांचे प्रमाण (४७ टक्के) प्रथम श्रेणी शहरात (३९ टक्के) आणि द्वितीय श्रेणी शहरांमध्ये (३४ टक्के)आहे.
पुण्यातून सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी ७७ टक्के व्यक्ती कोणते ‘डेटिंग अॅप’ वापरायचे ते ठरवतात. त्या खालोखाल लखनौमध्ये ७१ टक्के नागरिक मित्रांच्या सल्ल्याने हा निर्णय घेतात. या अहवालानुसार ४० टक्के प्रतिसादकर्त्यांना डेटिंग अॅपवरील व्यक्तीला कधीही न भेटता आपली वैयक्तिक माहिती देण्यात काहीही गैर वाटत नाही. विशेष म्हणजे ६६ टक्के महिला आणि जनरेशन एक्समधील ६३ टक्के व्यक्तींच्या मते त्यांना ऑनलाइन भेटणाऱ्या व्यक्ती विश्वासार्ह असतात.
दहा पैकी चार जण गंभीर नात्यासाठी ऑनलाइन डेटिंगचा वापर करतात. सर्वेक्षणात सहभाग असलेले महानगरांमधील ५५ टक्के व्यक्ती सुयोग्य नात्यासाठी, तर प्रथम श्रेणी शहरातील ६८ टक्के आणि द्वितीय श्रेणी शहरातील २१ टक्के सहभागांनी अनुक्रमे कॅज्युअल डेटिंग आणि शारीरिक जवळीक ही ऑनलाइन डेटिंग अॅप वापरल्याचे सांगितले. ६५ टक्के जनरेशन झेड सहभागी हे कॅज्युअल डेटिंगसाठी तर ६३ टक्के जनरेशन एक्स गंभीर नात्यासाठी ही अॅप वापरतात. नव्या पिढीतील (मिलेनिअल्स) ७२ टक्के सहभागी या अॅप्सचा वापर मैत्री आणि सहचर्याच्या शोधासाठी करतात. आपल्या जीवनशैलीला हे साजेसे नसल्याने अशी डेटिंग अॅप्स न वापरणाऱ्या प्रतिसादकर्त्यांची संख्याही लक्षणीय (४९ टक्के) असून या संकल्पनेबद्दल नकारात्मक बाबी ऐकल्याने त्यापासून दूर राहणाऱ्यांची संख्या २७ टक्के आहे.
स्मार्ट फोन बनला टीव्ही
मुंबई व जयपूरमधील ९१ टक्के व्यक्तींसाठी स्मार्ट फोन हाच टीव्ही बनला आहे. पुण्यात हे प्रमाण ८९ टक्के तर कोलकाता येथे ८८ टक्के आहे. परवडणाऱ्या दरात सहज उपलब्ध होणाऱ्या डेटामुळे पहिल्या श्रेणीतील शहरांमध्ये स्मार्ट फोन हेच मनोरंजनाचे प्राथमिक साधन बनले आहे, हेदेखील सर्वेक्षणातून समोर आले.
‘प्रत्येकाने आपल्या डिजिटल अस्तित्वाबद्दल अधिक गांभीर्याने विचार करणे महत्त्वाचे आहे. बनावट ओळखीचा वापर करून ऑनलाइन व्यासपीठांवर दिलेल्या माहितीचा गैरवापर करणे सायबर गुन्हेगारांसाठी अगदी सोपे असते. त्यामुळे नेटिझन्सनी याबाबत दक्षता बाळगावी,’ असे नॉर्टनलाइफलॉक इंडियाचे संचालक रितेश चोप्रा म्हणाले.

अधिक वाचा  पाकिस्तानचं सुपर 8 फेरीचं संपूर्ण गणित भारताच्या हाती, असं झालं तरच मार्ग होणार खुला