नवी मुंबई: नवी मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून या निमित्ताने भाजपचे नेते गणेश नाईक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यात रंगलेला कलगीतुरा थांबताना दिसत नाही. या दोन्ही नेत्यांनी निवडणूक भाषणात एकमेकांचा बाप काढला आहे. बाप बदलणारी औलाद नाही, या आव्हाड यांच्या टीकेला नाईकांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. ‘पक्षांतर करणाऱ्या शरद पवारांची गणनाही बाप बदलणाऱ्या औलादींमध्ये करणार का?’ असा सवाल करत गणेश नाईक यांनी आव्हाड यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी बाप बदलणारी औलाद नाही, अशी खोचक टीका गणेश नाईकांवर केली होती. त्याला नाईक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पवारांनीही तीनवेळा पक्ष बदलला आहे. मग त्यांचीही गणना बाप बदलणाऱ्या औलादीमध्ये करणार का? असा सवाल नाईक यांनी केला. पवारांनीही समाजकारण आणि राजकारण गतीमान व्हावं यासाठी एस काँग्रेसची स्थापना केली होती. पुलोद सरकारचं नेतृत्व केलं होतं. नंतर पुन्हा तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर १९९९मध्ये पुन्हा काँग्रेस सोडून राष्ट्रवादीची स्थापना केली. मग याला काय म्हणाल? असा सवालही नाईक यांनी केला.
गद्दारी गणेश नाईकांच्या रक्तातच; आव्हाडांची टीका
बाप बदलणारी औलाद मी नाही, असं वक्तव्य आव्हाड यांनी केलं. पण कोणीही एकाएकी पक्ष बदलत नाही. समाजकारण आणि राजकारणाला गती देण्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतात. स्वाभिमान जतन करण्यासाठीही पक्षांतरासारखा निर्णय घ्यावा लागतो, हे आव्हाडांना कसं कळणार? असा टोलाही त्यांनी हाणला. नाईक यांच्या या घणाघातील टीकेवर आव्हाड काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
माझा बापही नवी मुंबईत येईल
दरम्यान, तत्पूर्वी आव्हाड यांनी नाईक यांच्यावर घणाघातील हल्ला केला होता. जितेंद्र आव्हाड स्वतःचे डायलॉग स्वत: मारतो, कोणाचे चोरलेले डायलॉग मारत नाही. मी स्वत: स्क्रिप्ट लिहितो, स्वत: डायलॉग मारतो आणि स्वत:च्या आवाजात मारतो. मी एकदाच नवी मुंबईत गेलो तर गणेश नाईकांनी कथकलीच सुरू केली. अजून तर मी शंभरवेळा जाणार आहे. त्यानंतर माझा बापदेखील येईल. मला दर दहा वर्षांनी बाप बदलण्याची सवय नाही, अशी टीका आव्हाड यांनी केली होती.