मुंबई: राज्यसभेच्या सात जागांसाठी लवकरच होत असलेल्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व फौजिया खान हे दोघे आज अर्ज भरणार आहेत. मात्र, भाजपनं अद्यापही आपल्या अधिकृत उमेदवारांची घोषणा केलेली नाही. भाजपकडून रामदास आठवले व उदयनराजे भोसले यांची नावे निश्चित मानली जात असली तरी तिसरा उमेदवार कोण, याबद्दलचा सस्पेन्स कायम आहे.
महाराष्ट्राच्या कोट्यातून निवडून द्यावयाच्या सात जागांसाठी येत्या २६ मार्च रोजी निवडणूक होत आहे. राष्ट्रवादीकडून शरद पवार व फौजिया खान आज विधान भवनात अर्ज दाखल करणार आहेत. मात्र, भाजप, शिवसेना व काँग्रेसनं अद्याप आपल्या उमेदवारांची घोषणा केलेली नाही. त्यातही भाजपच्या उमेदवाराविषयी विशेष उत्सुकता आहे. भाजपकडून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले व साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं समजतं. मात्र, तिसऱ्या नावावर अद्याप एकमत होऊ शकलेलं नाही. या जागेसाठी एकनाथ खडसे यांच्या नावाचा आग्रह राज्य कार्यकारिणीनं धरला आहे. पक्षाच्या संसदीय बोर्डाकडं त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आल्याचं सूत्रांकडून समजतं. अर्थात, खडसे यांनी दिल्लीत जाण्यास होकार दर्शवला आहे का, याबाबत अद्याप कळू शकलेलं नाही. याशिवाय, शायना एन. सी. यांचंही नाव राज्यसभेच्या शर्यतीत आहे. त्यामुळं यापैकी कोणत्या नावाला पसंती मिळणार की ऐन वेळी वेगळंच नाव पुढं येणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पुण्यातील भाजपचे नेते संजय काकडे यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर पत्रकार परिषद घेऊन राज्यसभेवर दावा केला होता. उदयनराजे यांच्या नावाला त्यांनी विरोध दर्शवला होता. पक्षानं मेरिटवर निर्णय घेऊन आपल्याला संधी द्यावी, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यांना भाजपनं संधी न दिल्यास ते काय भूमिका घेतात, हेही पाहावं लागणार आहे.