मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून काँग्रेसला जबरदस्त हादरा दिल्याने ‘शिंदे पॅटर्न’बाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे लक्ष मध्य प्रदेशातील घडामोडींकडे लक्ष लागले आहे.
ज्योतिरादित्य शिंदे यांचा महाराष्ट्रात प्रभाव नसला तरी काँग्रेसचे नेते म्हणून त्यांचे अनेक नेत्यांशी स्नेहबंध आहेत. काँग्रेसच्या नेत्यांनी राज्यात शिंदे पॅटर्न अंमलात येण्याची शक्यता फेटाळून लावली. मात्र भाजप नेत्यांचा विश्वास उंचावला आहे. मात्र राज्यात तो अंमलात येण्याबाबत साशंक आहेत. ज्योतिरादित्य शिंदे यांनी महाराष्ट्रातील सभा किंवा दौऱ्यादरम्यान अनेकवेळा मराठीत संवाद साधून महाराष्ट्राशी असणारी जवळीक अधोरेखित केली. विधान सभा निवडणुकीदरम्यान राज्यात त्यांच्या प्रचार सभा झाल्या. बहुतांश ठिकाणी त्यांनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली. मराठा म्हणूनही त्यांनी स्वत:चा उल्लेख केला. महाराष्ट्रात सिंधिया नाही तर, शिंदे असल्याचा ते आवर्जुन उल्लेख करायचे. राज्यात त्यांच्या जवळचे नातेवाईक नाही. नागपुरातील भोसले कुटुंबीयांशी शिंदे घराण्याचे जुने स्नेहबंध आहेत.
मध्य प्रदेशातील राजकीय घडामोडींकडे राज्यातील सर्व पक्षांच्या नेत्यांचे लक्ष लागले आहे. भाजपच्या ‘ऑपरेशन लोटस’वर महाविकास आघाडीच्या विशेषत: काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांची बारीक नजर आहे. मध्य प्रदेशचा ‘इफेक्ट’ महाराष्ट्रात होऊ नये, याचीही खबरदारी घेतली जाण्याची शक्यता राहील. तथापी भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांची आज काय स्थिती आहे हे लक्षात घेणे महत्त्वाचे असल्याकडे काँग्रेसच्या एका नेत्याने लक्ष वेधले. राज्यसभेची निवडणूक व त्यातील समीकरणामुळे सर्वच पक्ष सजग आहेत. सद्य:स्थितीत महाराष्ट्रात समीकरण बदलणार नाही, असेही या नेत्याने सांगितले तर भाजपला कुठलीच घाई नसल्याचा दावा पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने केला. मध्य प्रदेशातील काँग्रेस व समर्थक आमदारांना तातडीने राजस्थानमध्ये पाठविण्यात आले आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आल्याचे समजते. यात राज्यातील नेत्यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका वठवली आहे.