पुणे : पदपथांवरून वाहने दामटण्याचे प्रकार, विविध प्रकारची अतिक्रमणे, रस्त्यावरील वाहनांचा वेग, खासगी गाडय़ांची गर्दी अशा विविध कारणांमुळे पदपथांवरून चालणे पादचाऱ्यांसाठी असुरक्षित ठरत असतानाच शहराच्या काही भागात पदपथच अस्तित्वात नसल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. वडगांव धायरी, सनसिटी, मयूर कॉलनी, डहाणूकर कॉलनी, कोथरूड डेपो, बावधन, बाणेर, बालेवाडी, पाषाण, धनकवडी, कात्रज आदी ठिकाणी पादचाऱ्यांसाठी पदपथांची वानवा असल्याचे एका सर्वेक्षणातून अधोरेखित झाले आहे. शहरातील ४१ प्रभागांपैकी नऊ प्रभागातील काही भागांत पदपथ नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
परिसर या संस्थेने शहरातील पदपथ व पादचाऱ्यांबाबत सर्वेक्षण केले आहे. ४१ प्रभागाअंतर्गत हे सर्वेक्षण करण्यात आले. त्यासाठी प्रत्येक प्रभागातील पंधरा नागरिकांशी संस्थेच्या प्रतिनिधींनी संवाद साधला. पादचाऱ्यांची सुरक्षितता, पदपथांची स्थिती, रोज चालणाऱ्या पादचाऱ्यांची संख्या, पदपथांवरील अडथळे आदींबाबत हे सर्वेक्षण करण्यात आले. त्या वेळी अनेक नागरिकांनी प्रभागत पदपथच नसल्याची तक्रार केली आहे.
वडगांव धायरी, सनसिटी, आंबेगाव, दत्तनगर, कात्रज, बावधन, कोथरूड डेपो अशा ठिकाणी पदपथ नाहीत. बहुतांश पदपथांवर कचरा पेटय़ा आणि स्वच्छतागृह, आवश्यक त्या ठिकाणी बसण्यासाठी बाके यासारख्या सुविधाही नसल्याचे चित्र आहे. पालिकेने पादचारी सुरक्षितता धोरणाला मान्यता दिली आहे. त्यानुसार पदपथ प्रशस्त असावेत, ते विना अडथळा असावेत, अशी नियमावली तयार केली आहे. प्रत्यक्षात बहुतांश पदपथांवर नानाविध अतिक्रमणे झाली आहेत. पादचारी असुरक्षित असल्याचे चित्र असतानाच पदपथांसारख्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात पालिकेला स्वारस्य नसल्याचे पुढे आले आहे. पादचाऱ्यांच्या नावाखाली काही ठरावीक पदपथांवर कोटय़वधी रुपयांची उधळपट्टी होत असतानाच पदपथ नसल्याच्या या विसंगतीमुळे पादचाऱ्यांबाबत पालिका व सत्ताधारी पक्ष संवेदनशील नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
आवश्यक सुविधाच नाहीत
पदपथांची दुरवस्था, पदपथांवरील अतिक्रमणे यासंदर्भात तक्रार कोठे करावी, याची माहिती ४२ टक्के नागरिकांना नाही. तर पादचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात किंवा मागण्यांसाठी शहरात मोहीम राबविण्यात यावी, असे मत ८५ टक्के नागरिकांनी व्यक्त केले आहे. पदपथांवर स्वच्छतागृहे, कचरा पेटी बसण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी बाक अशा पायाभूत सुविधा नसल्याचे ७० टक्क्य़ांपेक्षा जास्त नागरिकांनी सांगितले.
असुरक्षित वाटण्याचे प्रमाण
कळस-धानोरी, कसबा पेठ-सोमवार पेठ, कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी, कोरेगांव पार्क-घोरपडी, बाणेर-बालेवाडी-पाषाण या प्रभागातील सर्वेक्षणात सहभागी झालेल्या १०० टक्के नागरिकांना पदपथांवरून चालणे असुरक्षित वाटते. वडगांव-धायरी-सनसिटी प्रभागातील ८० टक्के लोकांच्या मनात असुरक्षिततेची भावना आहे, असेही चित्र सर्वेक्षणातून पुढे आले आहे.
अपघातांची भीती
पदपथांवर होणाऱ्या पार्किंगमुळे पदपथ वापरता येत नसल्याचे मत ६२ टक्के नागरिकांनी नोंदविले आहे. अपघाताची भीती, दिव्यांचा अभाव, अतिक्रमणे अशा कारणांमुळे पदपथांचा वापर करण्यास ५५ टक्के नागरिक नकार देत आहेत. त्यातही रस्त्यांना पदपथच नसल्याचे २७ टक्के नागरिकांनी म्हटले आहे.
पादचाऱ्यांच्या हक्कासाठी ‘स्टेप’
सुरक्षित पदपथ हा पादचाऱ्यांचा हक्क आहे. तो त्यांना मिळवून देण्यासाठी स्टेप्स टुवर्ड्स एम्पॉयरिंग पेडस्ट्रियन्स (स्टेप्स) या व्यासपाठीच्या माध्यमातून नागरिकांना जागृत करण्यात येणार आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून पादचाऱ्यांचे हक्क आणि त्यांच्या मागण्यांची पूर्तता होणार आहे. पदपथांची स्थिती सुधारण्यासाठीही पाठपुरावा करण्यात येणार आहे.
– सूरज जयपूरकर, वरिष्ठ व्यवस्थापक, जनजागृती मोहीम, परिसर

अधिक वाचा  मविआतील दोन पक्षांचं अखेर ठरलं?; एवढ्या जागा लढणार? मुख्यमंत्रीपदाबाबत ही भूमिका आकडाही समोर