औरंगाबाद : तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे बुधवारी औरंगाबादेत आगमन झाले. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे प्रमुख मुद्दे आता मनसेकडून अधिक प्रकर्षांने मांडले जात असल्याने निवडणुकीची गणिते बदलण्याची शक्यता आहे.
राज ठाकरे यांच्या गेल्या महिन्यातील दौऱ्यात त्यांनी औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर असे फलकावर लिहून महापालिकेच्या निवडणुकीत मनसे भगवा झेंडा अधिक उंचावून धरेल असे संकेत दिले होते. तसेच निवडणुकीच्या मैदानात उतरण्यापूर्वी तिथीनुसार मनसेकडून शिवजयंती साजरी केली जाईल, असे जाहीर करण्यात आले. शिवजयंतीचा हा उत्सव संघटनात्मक बळ वाढविण्यासाठी मनसेला उपयोगी पडेल असे सांगण्यात येत आहे.
अलिकडेच मनसेकडून संघटनात्मक बदलही करण्यात आले. शहर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सुहास दाशरथे यांच्याकडे देण्यात आली, तर राज्याचे उपाध्यक्ष म्हणून सुमीत खांबेकर यांची निवड झाली. दरम्यानच्या काळात मनसेकडून आंदोलने करण्यात आली. त्यात माजी आमदार हर्षवर्धन जाधव, प्रकाश महाजन हेही सहभागी झाले होते. संघटनेला बळ देणारा राज ठाकरे यांचा दौरा एका बाजूला सुरू असतानाच शिवसेनेचे मुद्दे मनसेच्या व्यासपीठावरून अधिक जोरकसपणे लावले जात आहे. औरंगाबादचे नाव संभाजीनगर व्हावे, अशी मागणी भाजपकडूनही रेटली जात आहे. हिंदुत्वाच्या मुद्यावरून शिवसेनेला मागच्या बाकावर ढकलता यावे म्हणून भाजप आणि मनसेकडून प्रयत्न सुरू असतानाच शिवसेनेनेही शहराचे नाव बदलता येऊ शकते काय, याची चाचपणी करायला सुरुवात केली आहे.
एका बाजूला शहराचे नाव बदलावे यासाठीच्या मागण्या आणि प्रशासकीय पातळीवरच्या हालचाली सुरू असतानाच भगवा झेंडा अधिक उंच कोणाचा, अशी शर्यत लागल्यासारखे वातावरण तीन पक्षांत दिसून येते. त्यात सेना-भाजपच्या बरोबरीने मनसेही उतरली आहे.