काँग्रेसला सोडचिठ्ठी देत मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकार संकटात आणणाऱ्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर भाजपने शिंदे यांना मध्य प्रदेशातून राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली. ज्योतिरादित्य शिंदेंबरोबर काँग्रेसच्या २२ आमदारांनीही पक्षाचा राजीनामा दिला आहे. हे सर्व आमदार बेंगळुरुमध्ये आहेत. हे आमदार आता भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर या आमदारांपैकी एक असणाऱ्या इमरती देवी यांनी एएनआयशी संवाद साधताना, ज्योतिरादित्य शिंदेंचा निर्णय योग्य असून त्यांनी सांगितल्यास आम्ही विहिरीतही उडी मारू असं म्हटलं आहे.
कमलनाथ यांच्या मंत्रीमंडळातील सहा मंत्र्यांचाही या २२ आमदारांमध्ये समावेश आहे. त्यामुळेच आता कमलनाथ सरकार पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच मंत्र्यांपैकी एक असणाऱ्या इमरती देवी यांनी “आम्ही सर्व २२ आमदार स्वइच्छेने ज्योतिरादित्य शिंदेंसोबत आलो आहोत,” असं म्हटलं आहे. “आम्ही आता बेंगळुरुमध्ये आहोत. आमच्या इच्छेनेच आम्ही येथे आलो आहोत. ज्योतिरादित्य शिंदेचा आशिर्वाद आमच्या पाठीशी आहे. त्यांनी घेतलेला निर्णय योग्यच आहे. त्यांनी सांगितलं तर किंवा अगदी त्यांच्यासाठी विहिरीत उडी मारावी लागली तरी मी मारेन. त्यांच्याबरोबर असलेले सर्व २२ आमदार स्वत:च्या इच्छेने त्यांच्यासोबत आले आहेत. त्यांची काँग्रेसने जेवढी उपेक्षा केली आहे तेवढी भाजपानेही केली नव्हती. मी स्वत: १० वर्षे भाजपामध्ये होते. त्यावेळी जी आमची स्थिती होती त्यापेक्षा वाईट परिस्थिती आता कमलनाथ यांनी केली आहे. आमचं सरकार येऊ द्या आमचं सरकार येऊ द्या असं दहा वर्षे आम्ही प्रयत्न करत होतो. मात्र जेव्हा आमचं सरकार आलं तेव्हा आमची परिस्थिती वाईट झाली की आमच्यावर एकही जबाबदारी टाकण्यात आली नाही. कमलनाथ यांनी आमचं तसेच ज्योतिरादित्य शिंदेंच काहीच ऐकून घेतलं नाही,” असं इमरती यांनी म्हटलं आहे.
बुधवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत ज्योतिरादित्य यांनी पक्षात प्रवेश केला. ज्योतिरादित्य हे आपल्या कुटुंबात परतत असून, आम्ही त्यांचे स्वागत करतो, असे नड्डा या वेळी म्हणाले. ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपप्रवेश कार्यक्रमात बोलताना काँग्रेसवर टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. “मध्य प्रदेशासाठी आपण आपल्या पूर्वीच्या सहकाऱ्यांसह जे स्वप्न पाहिले होते, ते गेल्या १८ महिन्यांत उद्ध्वस्त झाले. काँग्रेस पक्ष पूर्वीसारखा राहिलेला नाही,” अशी टीका शिंदे यांनी केली.

अधिक वाचा  प्रफुल्ल पटेल यांना सीबीआयकडून मोठा दिलासा, कथित 840 कोटींच्या घोटाळ्याचा तपास बंद