सिएटल: जगभरात करोनाने हाहाकार माजवला आहे. सुमारे १०० देशातील नागरिकांना करोनाची बाधा झाली असून एक लाख जणांवर उपचार सुरू आहेत. त्यातही अनेकांवर यशस्वी उपचार झाले आहेत. यातील काही रुग्णांनी आपला अनुभव शेअर करण्यास सुरुवात केली आहे. करोनाच्या आजारातून बऱ्या झालेल्या महिलेची फेसबुक पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
करोनाचा संसर्ग झाल्यामुळे वाढत जाणारी रुग्ण संख्या, मृतांची संख्या यामुळे अनेकांच्या मनात करोनाची भीती निर्माण झाली आहे. ही भीती कमी करण्यासाठी या सिएटल येथील एलिझाबेथ स्कोनिडरने आपले अनुभव सोशल मीडियावर व्यक्त केले आहे. ताप येण्याच्या आदल्या रात्री आपण एका छोट्या पार्टीत असल्याची आठवण तिने सांगितली. या पार्टीत सगळ्यांची प्रकृती उत्तम होती. त्यामध्ये असलेल्या कोणालाही खोकला, ताप, सर्दी नव्हती. मात्र, त्यानंतरच्या तीन दिवसांत पार्टीत असलेल्या ४० टक्के जणांना सर्दी, ताप, खोकला झाला. माध्यमांमध्ये देण्यात येणाऱ्या सूचनेनुसार मी सतत हात स्वच्छ ठेवत होते. त्याशिवाय कोणाचीही हस्तांदोलन करणे टाळत होते.
वयोमानानुसार, आजाराची लक्षणे आढळली असल्याचे निरीक्षण एलिझाबेथने नोंदवले. पहिल्या दिवशी मला १०३ अंश सेल्सियसचा ताप आला. दुसऱ्या दिवशी तापाची तीव्रता कमी झाली आणि ९९.५ अंश सेल्सिअस तापाची नोंद करण्यात आली. एका दिवशी मला सर्दी झाली आणि एका नाकपुडीने श्वास घेण्यास त्रास झाला. आमच्यातील काहीजणांना श्वास घेण्याबाबतचा त्रास झाला. आजारपण हे १० ते १६ दिवस असल्याचे तिने सांगितले. त्यानंतर माझी सिएटलमध्ये वैद्यकीय चाचणी झाली. या चाचणीत मला करोनाची लागण झाली असल्याचे तिने सांगितले. त्यानंतर डॉक्टरांच्या सूचनांचे पालन करून आजारातून बरी झाली असल्याचे एलिझाबेथने फेसबुकवर म्हटले.
करोनासारख्या आजारातून बरे होता येईल. कोणताही आजार अंगावर काढण्याऐवजी डॉक्टरांना भेटून त्यांच्या सल्ल्याने औषधोपचार करण्याची आवश्यकता आहे. करोनाबाबत भीती न बाळगण्याचे तिने आवाहन केले.