मुंबई : येस बँकेचे जवळपास ६० हजार कोटी देशातील १५ बड्या उद्योग समूहांनी बुडवले आहेत. त्यातील १० कर्जबुडव्या कंपन्यांची नावे भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सोशल मीडियावर जाहीर केली. या कंपन्यांच्या थकबाकीने येस बँक बुडाली असा दावा त्यांनी केला.
गेल्या आठवड्यात रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर आर्थिक निर्बंध लादले आहेत. यामुळे ३ एप्रिलपर्यंत येस बँकेच्या ग्राहकांना खात्यातून केवळ एकदाच ५० हजारांची रक्कम काढता येण्याची परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, येस बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक व सीईओ राणा कपूर यांना ‘ईडी’ने अटक केली असून त्यांची चौकशी केली जात आहे. कपूर यांनी त्यांची काॅर्पोरेट मैत्री जपली आणि मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप केल्यानं बॅंकेची स्थिती खालावली असा आरोप होत आहे. दरम्यान, राणा कपूर यांनी बुडीत कर्जांवर हात झटकले आहेत.
सोमय्या यांनी येस बँकेच्या बड्या थकबाकीदार कंपन्यांनी नावे आणि थकबाकीची रक्कम यांची बुधवारी माहिती उघड केली. यात अनिल अंबानी १२८०० कोटी, एस्सेल ग्रुप ८४०० कोटी, DHFL ग्रुप ४,७३५ कोटी, IL&FS २,५०० कोटी, ओमकार रिअॅल्टर्स २,७१० कोटींचे कर्ज थकवले आहे. त्याशिवाय जेट एअरवेज १,१०० कोटी, कॉक्स अॅण्ड किंग्ज आणि गो ट्रॅव्हल्स १००० कोटी, बी. एम खेतान १२५० कोटी, रॅडियस डेव्हलपर्स १२०० कोटी सी. जी पाॅवर ५०० कोटी बुडवले असल्याचे सोमय्या यांनी म्हटलं आहे. या कंपन्यांच्या थकबाकीने येस बँक बुडाली असा दावा त्यांनी केला.

अधिक वाचा  शरद पवारांच्या सोलापुरातल्या विश्वासू सहकाऱ्याचं प्रयागराजमधील कुंभमेळ्यात हार्ट अटॅकने निधन