मंगळवारी ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर ते स्वत:चा नवा पक्ष काढतील का भाजपात जातील, अशा चर्चांना उधाण आलं होतं. परंतु बुधवारी त्यांनी भाजपात प्रवेश करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. त्यानंतर महाराष्ट्रातलंही सरकार लवकरच कोसळेल असा दावा काही नेत्यांकडून करण्यात आला होता. परंतु ठाकरे सरकार अभेद्य असून उलट्या वरातीत नाचणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावं, अशी टीका शिवसेनेनं केली आहे.
ज्योतिरादित्य शिंदे यांना गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने संपूर्ण ताकद लावून पराभूत केले. त्या ज्योतिरादित्य यांना भाजपने वाजतगाजत आपल्या पक्षात प्रवेश दिला. मध्य प्रदेशातील ही ‘उलटी वरात’ भाजपला बेटकुळ्या फुगवणारी जरूर वाटत असली तरी काँग्रेसचे विद्यमान मुख्यमंत्री कमलनाथ हेदेखील कसलेले आणि मुरलेले राजकारणी आहेत. हिकमती आणि करामती आहेत. काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात जे ‘न भूतो’ असे अनपेक्षित राजकीय नाट्य घडले तसा एखादा धक्कादायक ‘प्रयोग’ मध्य प्रदेशातही घडू शकतो. हे मध्य प्रदेशातील ‘उलट्या वराती’त नाचणाऱ्या भाजपच्या ‘वऱ्हाडी’ मंडळींनी लक्षात ठेवलेले बरे, असं म्हणत शिवसेनेने भाजपावर टीकेचा बाण सोडला आहे. सामनाच्या संपादकीयमधून शिवसेनेने भाजपावर टीका केली आहे.
काय म्हटलंय अग्रलेखात ?
दैव देते आणि कर्म नेते अशी अवस्था काँग्रेस पक्षाची झाली आहे. मध्य प्रदेशात काँग्रेस पक्षातच बंड झाले. विधिमंडळ काँग्रेस पक्षात फूट पडली. काँग्रेसच्या किमान 22 आमदारांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा त्याग केला. शिंदे यांनी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे कमलनाथ यांचे सरकार अल्पमतात आले. मध्य प्रदेशात काँग्रेसचे सरकार कोसळलेच तर त्याचे श्रेय भाजपच्या चाणक्य मंडळाने घेऊ नये. कमलनाथांचे सरकार कोसळताना दिसत आहे ते बेफिकिरी, हलगर्जीपणा, अहंकार आणि नव्या पिढीस कमी लेखण्याच्या प्रवृत्तीमुळे. दिग्विजय सिंग, कमलनाथ हे मध्य प्रदेशातील जुनेजाणते नेते आहेत. कमलनाथही पुरातन आहेत. त्यांची आर्थिक शक्तीही मोठी आहे. म्हणून तर काठावरचे बहुमत असतानाही त्यांनी इकडचे तिकडचे आमदार गोळा करून पाठिंब्याची मोट बांधली होती. हे सत्य असले तरी ज्योतिरादित्य शिंदे यांना मध्य प्रदेशात टाळून राजकारण करता येणार नाही.
शिंदे यांचा प्रभाव संपूर्ण राज्यावर नसेलही, पण ग्वाल्हेर, गुना अशा मोठय़ा भागावर आजही शिंदेशाहीचा प्रभाव आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी ज्योतिरादित्य शिंदे हाच काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा होता. पण नंतर ज्येष्ठांनी त्यांचा काटा काढला व दिल्लीचे हायकमांड हतबलतेने पाहात राहिले. त्या वेळची मध्य प्रदेशची स्थिती गुंतागुंतीची होती हे नक्की, पण लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांना ‘अडगळीत’ टाकणे काँग्रेस पक्षाला सोयीचे नव्हते. या असंतोषातूनच गेल्या दोनेक महिन्यांपासून ठिणग्या उडत होत्या.
मध्य प्रदेशात पुढे आणखी काय घडते ते लवकरच समजेल, पण तेथील घडामोडींनी महाराष्ट्रातील भाजपवाल्यांनी उड्या मारू नयेत. मध्य प्रदेशचे राजकारण त्याच्या जागी, महाराष्ट्रामधील कमळ पंथीयांनी चालता बोलता स्वप्ने पाहू नयेत. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली चालले आहे. ते मजबूत व अभेद्य आहे. एखाद्या फितूर मुंगीलाही आत-बाहेर करता येईल इतकीही फट त्यात नाही. तेव्हा स्वप्न बघणे सोडा इतकाच सल्ला आम्ही त्यांना देत आहोत.

अधिक वाचा  महायुती 2.0 मुख्यमंत्र्यांचा शपथविधी? हा आहे शुभमुहूर्त?; हा सन्मानाचे दिल्लीचे आश्वासनचं पुरेसे: दीपक केसरकर