लग्नाची वरात लग्नमंडपात पोहोचली होती. नवरामुलगा बोहल्यावर चढण्यास तयार होता. पाहुण्याचं थाटामाटात स्वागत केलं जात होतं. पण हे सगळं सुरु असताना नवरीमुलगीचा कुठेच थांगपत्ता नव्हता. काही वेळाने मुलगी आपल्या प्रियकरासोबत फरार झाल्याचं कळालं आणि मंडपात एकच गोंधळ झाला. नवऱ्यामुलाला जेव्हा हे कळलं तेव्हा त्याचा तिळपापड झाला. जोपर्यंत वरातीचा आणि इतर खर्चाचे पैसे मिळत नाहीत तोपर्यंत आपण येथून हटणार नाही सांगत त्याने धरणं आदोलनच सुरु आहे. यानंतर पंचायतीला बोलावण्यात आलं. त्यांनी प्रकरण मिटवलं आणि नवऱ्यामुलाला परत पाठवलं. झारखंडमधील लातेहार जिल्ह्यात ही घटना घडली आहे.
नवरीमुलीच्या बहिणीशी लग्न लावून देण्याचा हट्ट
शुक्रवारी रात्री हे लग्न होणार होतं. नवरीमुलगी पळून गेल्याने चिडलेल्या नवऱ्यामुलाने आधी सगळ्या खर्चाचे पैसे परत मागण्यास सुरुवात केली. नंतर तर त्याने नवरीमुलीच्या बहिणीशी लग्न लावून देण्याची अजब मागणी केली. त्याच्या या मागणीमुळे सगळेच चक्रावले. यादरम्यान नवऱ्यामुलीच्या घऱचे मुलीचा शोध घेत होते. पण तिचा काही थांगपत्ता लागला नाही. दुसरीकडे नवरीमुलीच्या बहिणीनेही लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला.
यानंतर मात्र नवऱ्यामुलाने आपल्याला लग्नाचा खर्च देण्याची मागणी सुरु केली. प्रकरण हाताबाहेर जात असल्याचं पाहून सकाळी मुलीचे वडीलही गायब झाले. प्रकरण चिघळत असल्याचं पाहून पंचायत बोलावण्यात आली. पंचायतीने नवऱ्यामुलाला दीड लाख रुपये देण्याचा आदेश दिला. त्याला त्यातील काही रक्कम दिल्यानंतर पुन्हा परतण्यास अखेर तो तयार झाला.

अधिक वाचा  विठ्ठल मंदिर व्हीआयपी दर्शन बंद तरी मंत्र्यांची व्हीआयपी दर्शनाच्या शिफारस पत्रावरून भाविकांमधून तीव्र नाराजी