बेंगळुरू: काँग्रेसचे संकटमोचक म्हणून भारतीय राजकारणात ओळख निर्माण करणारे नेते डी. के. शिवकुमार यांच्यावर कर्नाटक काँग्रेसच्या प्रदेशाध्यपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दिनेश गुंडुराव यांच्या जागी शिवकुमार यांची नियुक्ती झाली आहे. डोड्डालाहल्ली केम्पेगौडा शिवकुमार हे कर्नाटक काँग्रेसचे वोकालिग्गा समाजाचे मोठे नेते आहेत. मागील सिद्धारमय्या सरकारमध्ये ते ऊर्जा मंत्री होते. या बरोबरच ईश्वर खांद्रे, सतीश जारकीहोली आणि सलीम अहमद यांची कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
गुजरात राज्यसभा निवडणुकीदरम्यान डी. के. शिवकुमार हे चर्चेत होते. शिवकुमार यांनी त्यावेळी आमदारांना घोडेबाजारापासून दूर ठेवण्यासाठी आपल्या रिसॉर्टमध्ये ठेवले होते.
डी. के. शिवकुमार यांची सन २००९ मध्ये कर्नाटक काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्रातील सरकार वाचवण्यातील शिवकुमार यांचे योगदान काँग्रेस हायकमांडच्या लक्षात आले. त्यानंतर कर्नाटकमध्ये ते काँग्रेसचे ट्रबलशूटर बनले. शिवकुमार हे कर्नाटकातील सर्वात श्रीमंत उमेदवारांपैकी एक आहेत. सन २०१३ मधील निवडणुकीदरम्यान त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपली संपत्ती २५० कोटी रुपये असल्याचे सांगितले होते. आता त्यांच्या संपत्तीत वाढ होऊन ती ६०० कोटींवर पोहोचली आहे.
एच. डी. देवेगौडा यांच्या विरोधात निवडणूक लढतच शिवकुमार यांनी सन १९८५ मध्ये आपल्या राजकारणाची सुरुवात केली होती.
अनिल चौधरी यांच्या हाती दिल्ली काँग्रेसची धुरा
या बरोबरच, अनिल चौधरी यांची नियुक्ती दिल्ली प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी करण्यात आली आहे. चौधरी यांची नियुक्ती सुभाष चोपडा यांच्या जागी करण्यात आली आहे. सुभाष चोपडा यांच्या नेतृत्वातच काँग्रेसच्या दिल्ली विधानसभा निवडणूक लढवली गेली होती. या निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. ही काँग्रेस पक्षासाठी मोठी नामुष्कीची वेळ होती. दिल्ली विधानसभेच्या ७० पैकी ६७ जागांवर तर पक्षाच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते.
दिल्ली काँग्रेस समितीचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष अनिल चौधरी हे पटपडगंज विधानसभा मतदारसंघाचे आमदारही होते.

अधिक वाचा  टीम इंडियाच्या घोषणेपूर्वीच कापला गेला या खेळाडूचा पत्ता