मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या मार्गातील अडथळे अजूनही कायम असून गेल्या वर्षी मागविलेल्या निविदा जादा दराने आल्याने मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) रद्दबातल केल्या.बाळासाहेब ठाकरे स्मारक सार्वजनिक न्यासाच्या सल्ल्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी विधान परिषदेत सांगितले.
विलास पोतनीस, हेमंत टकले, किरण पावस्कर आदींनी स्मारकाच्या कामाची सद्यस्थिती काय आहे आणि काम पूर्ण होण्यासाठी किती कालावधी लागणार आहे, या संदर्भात प्रश्न उपस्थित केले होते.स्मारकाच्या उभारणीसाठी एमएमआरडीएने २४ फेब्रुवारी २०१९ रोजी निविदा मागविल्या होत्या. त्यासाठी दोन निविदा सादर करण्यात आल्या. त्यापैकी सर्वात कमी किमतीची निविदा ५४.५० टक्के अधिक दराची असल्याने रद्द करण्यात आली आहे. आता न्यासाच्या सूचनेनुसार निर्णय घेतला जाणार असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.