भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी संघात कधी पुनरागमन करणार, याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना आहे. पण आता बीसीसीआयच्या एका मोठ्या अधिकाऱ्याने धोनीच्या पुनरागमनाची शक्यता धुसर असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे धोनी आता भारताकडून खेळताना मैदानात दिसणार की नाही, याबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकानंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. धोनीच्या जागी संघात स्थान देण्यात आलेला रिषभ पंतही आता बऱ्याच वेळा नापास झालेला पाहायला मिळाला आहे. त्यामुळे आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकात पंतला खेळवायचे का, हा प्रश्न आता भारतीय निवड समितीपुढे नक्कीच आहे. काही दिवसांपूर्वी भारतीय संघाने ट्वेन्टी-२० सामन्यात लोकेश राहुलकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी स्वीकारली होती. पण तो कामचलाऊ यष्टीरक्षक असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी धोनीला संधी द्यावी, असे काही माजी क्रिकेटपटूंनाही वाटत आहे.
बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी धोनीच्या एका प्रश्नावर राहुल जोहरी म्हणाले की, ” भविष्यातील क्रिकेट पाहून बीसीसीआय आणि निवड समिती आपली रणनिती ठरवत असते. संघाता वारंवार काही बदल केले जात आहेत. सध्याच्या घडीला भारतीय संघातील प्रत्येक स्थानासाठी चांगली स्पर्धा सुरु आहे. एका स्थानासाठी बरेच पर्याय निवड समितीपुढे उपलब्ध आहेत. त्यामुळे भविष्यातील क्रिकेट पाहता निवड समिती या साऱ्या पर्यायांचा विचार करत आहेत.”
रविवारी भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील जोशी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी संघ जाहीर केला. या संघात धोनीला स्थान देण्यात आले नाही. हे धोनीला निवड समितीने दिलेले संकेत आहेत, असे चाहते म्हणत आहेत.
काही दिवसांपूर्वी भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एक वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते की, ” धोनीने भारतीय क्रिकेटसाठी भरपूर काही केले आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटमध्ये त्याचे मोठे योगदान आहे. तो सध्या संघात नाही. पण आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकात तो आपल्याला दिसू शकतो. यासाठी धोनीची आयपीएलमध्ये कशी कामगिरी होते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.”

अधिक वाचा  विधानसभेत 100% पाडायचं? 50 जणांची यादी तयार; मनोज जरांगेंच्या आधी यांनी उमेदवारांची नावं सांगितली!