नवी दिल्ली : काँग्रेसमध्ये असलेला ‘जनरेशन गॅप’ आता खुल्लमखुल्ला बाहेर आलाय. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजीनाम्यानं मध्य प्रदेशात काँग्रेसला मोठी खिंडार पडलीय. इतकंच नाही तर मध्य प्रदेशात आपलं सरकार वाचवणंही काँग्रेसला कठिण जाणार असल्याची चिन्हं आहेत. त्यामुळे ज्योतिरादित्य शिंदे यांची चर्चा होणारच हे तर साहजिकच आहे… पण ट्विटरवर ट्रेन्डिंगवर मात्र काँग्रेसचे आणखीन एक तरुण नेते आणि राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट आहेत. ज्योतिरादित्य शिंदे यांच्यानंतर आता सचिन पायलटही काँग्रेसला रामराम ठोकणार का? अशा शक्यता आणि चर्चा सोशल मीडियावर रंगल्यात.
दुसरीकडे, सचिन पायलट यांनी मात्र मध्य प्रदेशचा राजकीय पेच लवकरच सुटेल, अशी आशा व्यक्त केलीय. ‘मला आशा आहे की मध्यप्रदेशवर घोंघावणारं राजकीय संकट लवकरच संपुष्टात येईल. सर्व नेते मतभेदांना दूर सारण्यात यशस्वी होतील. निवडणुकीत दिलेल्या वचनांना पूर्ण करण्यासाठी राज्याला एका स्थिर सरकारची गरज आहे’ असं सचिन पायलट यांनी म्हटलंय.
मंगळवारी मध्य प्रदेश काँग्रेसला ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजीनाम्यानं मोठा धक्का बसलाय. ज्योतिरादित्य शिंदे यांनी ९ मार्च रोजी सोनिया गांधी यांना उद्देशून एक पत्र लिहित आपण पक्षाचा राजीनामा देत असल्याचं म्हटलं. उल्लेखनीय म्हणजे, सोमवारी दिल्लीतील आपली घरी पोहचण्याअगोदर ज्योतिरादित्य यांनी राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांची भेट घेतली होती.
ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर सोशल मीडियावर अनेक मिम्स व्हायरल झालेत. तर काही युझर्स ‘शिंदे यांच्यानंतर आता सचिन पायलट’ म्हणत काँग्रेसवर निशाणा साधत आहेत. मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीत ज्योतिरादित्य शिंदे आणि सचिन पायलट अनेकदा एकमेकांसोबत उभे राहिलेले दिसले.
१९ आमदारांचा पाठिंबा
ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर बंगळुरुमध्ये काँग्रेसच्या सहा मंत्र्यांसहीत १९ आमदारांनीही आपला राजीनामा सोपवल्याचं समजतंय. आज सायंकाळपर्यंत ज्योतिरादित्य शिंदे भाजपमध्ये सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. उल्लेखनीय म्हणजे, आज सकाळी जवळपास दोन तास शिंदे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासोबत बैठक पार पडली.