“कोणत्याही व्यक्तीमध्ये करोनाचं लक्षण दिसल्यास त्यांना ताबडतोब नायडू रूग्णालयात दाखल करा,” असं आवाहन पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर यांनी केलं. “तसंच कोणत्याही डॉक्टरांनी अशा रूग्णांना त्यांच्या पातळीवर न तपासता त्यांना नायडू रूग्णालयात पाठवावं,” असंही त्यांनी नमूद केलं.
“रूग्णांमध्ये करोनाची लक्षणं आढळल्यास डॉक्टरांनी त्यांच्या परदेशवारीची पार्श्वभूमी तपासून पाहावी. तसंच त्यांना नायडू रूग्णालयात पाठवावं. लोकांनीही गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं. तसंच गरज नसल्यास त्यांनी प्रवासही टाळावा,” असं आवाहन डॉ. म्हैसकर यांनी केली. यावेळी त्यांनी पुण्यात आढळलेल्या करोनाग्रस्त रूग्णांबाबतही माहिती दिली. “पुण्यात दोन करोनाग्रस्त रूग्ण आढळले आहेत. ते फेब्रुवारीच्या अखेरच्या महिन्यात दुबईला गेले होते. तसंच ते १ मार्चला भारतात परतले. त्यांना करोनाची लागण झाली आहे. सध्या त्यांना नायडू रूग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर आहे,” असंही त्यांनी सांगितलं.
“त्यांच्यासोबत जे कोणी लोकं प्रवास करत होते त्यांचीही माहिती घेण्यात आली आहे. तसंच त्यांच्यावरही लक्ष ठेवण्यात येत आहे. संबंधित रूग्ण मुंबईहून पुण्याला टॅक्सीनं गेले होते. त्यांना पुण्याला सोडणाऱ्या टॅक्सी चालकाचेही नमूने तपासण्यासाठी पाठवण्यात आले आहेत,” असं म्हैसकर यांनी नमूद केलं. “कोणत्याही रूग्णाबाबत माहिती मिळाल्यास ती सार्वजनिक करण्यात येऊ नये, जेणेकरून त्या रूग्णांना आणि आम्हाला कोणतीही अडचण होणार नाही,” असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

अधिक वाचा  अंतरवली लाठीचार्जनंतर जरांगे तात्काळ निघूनही गेले होते पण… ‘या’ दोघांनी परत बसवले: भुजबळांचे गंभीर आरोप