पुणे : शहरातील उच्चभ्रू भागात ऑनलाइन पद्धतीने केल्या जाणाऱ्या वेश्याव्यवसायाचे (एस्कॉर्टिग) जाळे फोफावले असून दलालाकडून शिवाजीनगर भागात पाठविण्यात आलेल्या एका परदेशी महिलेला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर सामाजिक सुरक्षा विभागाने हिंजवडीतील एका हॉटेलवर छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत तीन परदेशी महिलांसह सहा जणींना ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणात एका दलालाचे नाव निष्पन्न झाले आहे. मॉन्टी उर्फ जगन्नाथ आर्यल असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दलालाचे नाव आहे. गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागाचे पथक डेक्कन भागात गस्त घालत होते. त्यावेळी शिवाजीनगर भागातील एका हॉटेलजवळ परदेशी महिला थांबली असून तिला वेश्या व्यवसायासाठी मॉन्टी नावाच्या दलालाने पाठविले असल्याची माहिती पोलीस शिपाई पुष्पेंद्र चव्हाण आणि संतोष भांडवलकर यांना मिळाली. पोलिसांनी तेथून परदेशी महिलेला ताब्यात घेतले. चौकशीत मॉन्टीने हिंजवडी भागातील एका हॉटेलमध्ये महिलांना ठेवल्याची माहिती मिळाली. या हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत सहा महिलांना ताब्यात घेण्यात आले. त्यापैकी तीन महिला परदेशातील असून त्या मूळच्या कझाकिस्तान आणि उझबेकीस्तानमधील आहेत. सुटका करण्यात आलेल्या अन्य तीन महिलांपैकी एक नेपाळची आहे. दोघी भारतीय आहेत. अतिरिक्त आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त बच्चन सिंह, सहाय्यक आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

अधिक वाचा  बुलडाण्यामध्ये खळबळजनक घटना; अधिकाऱ्यासमोरच महिलेचे थेट हातावर ब्लेडने सपासप वार असं काय घडलं?